शुभेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी घडविली; अकरा जणांविरुद्ध सीबीआयचे ‘चार्जशीट’

Chandranath Rath: . सीबीआयने 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये भाजपचे दोन कार्यकर्ते सागर सोनकर (Sagar Sonkar) आणि साहेब सोनकर ( Saheb Sonkar) या दोघांचा समावेश आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Chandranath Rath

CBI Files Chargesheet In Suvendu Adhikari Aide Murder : पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते असताना शुभेंदू अधिकारी ((Suvendu Adhikari) यांचे स्वीय सहायक (पीए) चंद्रनाथ रथ (Chandranath Rath ) यांच्या हत्याप्रकरणात मोठा ट्वीस्ट आलाय. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या हत्येवर पश्चिम बंगालमध्ये राजकारणात पेटले होते. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी ही हत्या केल्याचा आरोप केला होता. परंतु ही हत्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. रथ यांच्या कार्यालयातून बसून ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

चंद्रथान रथ हे शुभेंदू अधिकारी यांचे कामकाज पाहत होते. पश्चिम बंगालच्या निवडणूक झाल्यानंतर ही हत्या झाली होती. तृणमूल काँग्रेसला पराभूत करत बंगालमध्ये भाजपने सत्ता आणली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 मे 2026 रोजी बंगालमधील मध्यमग्राम येथे चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. निवडणुकीनंतर उसळलेल्या तीव्र राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही हत्या झाली होती. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हत्याचा आरोप लावला होता.

या हत्येचा तपास थेट सीबीआयकडे देण्यात आला होता. सीबीआयने 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये भाजपचे दोन कार्यकर्ते सागर सोनकर (Sagar Sonkar) आणि साहेब सोनकर ( Saheb Sonkar) या दोघांचा समावेश आहे. हे दोघे एकमेंकाचे भाऊ आहेत. या दोघांना सीबीआयने यापूर्वीच अटक केली आहे. तपासानुसार दोन्ही भाऊ २०२० मध्ये भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यापूर्वी ते एका अन्य राजकीय पक्षाशी संबंधित होते आणि त्या पक्षाच्या एका आमदारासाठी काम करत होते. तपासात हत्येसाठी उत्तर प्रदेशातून भाडोत्री मारेकरी बोलावण्यात आल्याचे समोर आले आहे. सोनकर बंधूंनी या मारेकऱ्यांना सुपारी दिली आणि त्यांच्या मोबदल्याची व्यवस्था केली, असा आरोप त्यांच्यावर आहे.

डिसेंबरमध्ये रचला होता कट
रथ यांच्या हत्येचा कट डिसेंबर 2025 पासूनच सुरू झाला होता. त्यानुसार उत्तर प्रदेशातील भाडोत्री मारेकऱ्यांशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, विविध कारणांमुळे हत्येची तारीख अनेक वेळा बदलण्यात आली. अखेर 6 मे रोजी या कटाची अंमलबजावणी करण्यात आली. तपासात उत्तर प्रदेशातील अनेक शूटर या हत्येसाठी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच शूटरशी संपर्क साधणे आणि हत्येची सुपारी देण्यामध्ये काही मध्यस्थांची भूमिका असल्याचेही तपासात समोर आले आहे. ही हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झाली की त्यामागे व्यापक राजकीय हेतू होता, याचा तपास सीबीआय करत आहे.


सहा शूटर्सला अटक

आतापर्यंत चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात सीबीआयने सहा शूटरना अटक केलीय. यामध्ये मनु सिंह, राज सिंह, गोलू सिंह, मयंक राज मिश्रा, विकी मौर्य आणि नवीन कुमार सिंह यांचा समावेश आहे. याशिवाय विनय राय, संजय राय आणि विकास मिश्रा या तीन मध्यस्थांनाही हत्येची सुपारी पोहोचवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या चौकशीत हत्येचे नियोजन, शूटरशी समन्वय आणि आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती मिळाल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. आरोपपत्रात ११ जणांची नावे असली तरी यापैकी एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडून केला जात आहे.

follow us