शुद्धीकरणावर FIR ची मागणी करणाऱ्या राहुल गांधींवरच गुन्हा; दलितांच्याच भावना दुखावल्याचा आरोप

Case registered against Rahul Gandhi‘शुद्धीकरण’ वरून निर्माण झालेला वाद राहुल गांधींवरच बुमरँग झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

Case Registered Against Rahul Gandhi

Case Registered Against Rahul Gandhi

Case registered against Rahul Gandhi after demanded FIR over ‘purification’ ritual allegetions of hurting sentiments of Dalits : उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर झालेल्या कथित ‘शुद्धीकरण’ कार्यक्रमावरून निर्माण झालेला वाद आता काँग्रेस नेते राहुल गांधींवरच बुमरँग झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. कारण हल्द्वानी पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात FIR दाखल केली आहे. धार्मिक विधीला जातीय स्वरूप देऊन वाल्मीकि आणि अनुसूचित जातीतील नागरिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, 1989 अंतर्गतही गुन्हा नोंदवला आहे. एफआयआर दाखल करणाऱ्या संघटनेतील काही व्यक्तींचे संबंध आरएसएस-भाजपशी असल्याचे सांगितले जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

या वादाची सुरुवात 8 ऑगस्ट रोजी झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हल्द्वानीतील रामलीला मैदानावर जाहीर सभेला संबोधित केले होते. त्यानंतर काही दिवसांनी, 11 ऑगस्ट रोजी याच मैदानावर काही लोकांनी हवन-यज्ञ आणि कथित ‘शुद्धीकरण’ कार्यक्रम आयोजित केला. यावेळी गंगाजल शिंपडण्यात आल्याचेही सांगण्यात आले. काँग्रेसने या घटनेचा संबंध खर्गे यांच्या दलित अस्मितेशी जोडत भाजप आणि आरएसएसच्या कथित मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केले. मात्र भाजपने वेगळी भूमिका मांडली.

‘हिरो कोण विचारलं तर एकानं खान, दुसऱ्यानं पुष्पा सांगितलं’; समीर वानखेडेंचं नव्या पिढीवर भाष्य

सभेनंतर मैदानात अस्वच्छता झाली होती आणि धार्मिक स्थळी आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्यामुळे धार्मिक विधी करण्यात आल्याचा भाजपचा दावा आहे.या प्रकरणात काही आक्षेपार्ह घोषणांचा संबंध विशिष्ट समुदायाशी जोडण्यात आला. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही आपल्या वक्तव्यात एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख केला होता. राहुल गांधी यांनी ‘शुद्धीकरण’ करणाऱ्यांविरोधात FIR दाखल करण्याची मागणी केल्यानंतर धामी यांचे हे वक्तव्य आले होते. त्यानंतर दलित संघटना आणि वाल्मीकि समाजातील काही नेते पुढे आले आणि त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

अमित कुमार यांच्या तक्रारीवरून राहुल गांधींवर गुन्हा

राहुल गांधी यांच्याविरोधात अमित कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे. ते जवाहर नगर परिसरातील रहिवासी असून श्री राम सेना धर्मार्थ सेवा न्यासाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, कथित धार्मिक विधी आणि स्वच्छता मोहिमेच्या वेळी ते घटनास्थळी उपस्थित होते.तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, 29 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा संबंध अस्पृश्यता आणि दलितविरोधी मानसिकतेशी जोडला.

अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; लारक बेटावर US चा हल्ला, इराणकडून बॅलेस्टिक मिसाइलने प्रत्युत्तर

त्यामुळे वाल्मीकि समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. तक्रारदाराने स्वतः अनुसूचित जातीतील असल्याचे सांगितले आहे. कार्यक्रमात विविध समाजघटकांसह अनुसूचित जातीतील लोकही सहभागी झाले होते आणि या कार्यक्रमाचा मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जातीशी कोणताही संबंध नव्हता, असा त्यांचा दावा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल गांधींविरोधात विविध समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे आणि जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्यासंदर्भातील BNS कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचाही एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला आहे.

राहुल गांधींनी ‘शुद्धीकरण’ करणाऱ्यांवर कारवाईची केली होती मागणी

29 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी हल्द्वानीतील या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. कथित ‘शुद्धीकरण’ हा अस्पृश्यतेचाच एक प्रकार असल्याचे सांगत त्यांनी संबंधितांवर SC/ST कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. भाजप-आरएसएसच्या कथित विचारसरणीवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते की, दलित समाजाने प्रगती करावी, सन्मानाने जगावे आणि यशस्वी व्हावे, हे काही लोकांना मान्य नाही. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनीही राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा देत या घटनेला लाजिरवाणी आणि निषेधार्ह मानसिकतेचे उदाहरण म्हटले होते.

वादाला आता कायदेशीर लढाईचे स्वरूप

हल्द्वानीतील हा वाद आता केवळ भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपापुरता मर्यादित राहिलेला नाही. एका बाजूला राहुल गांधी आणि काँग्रेसने कथित ‘शुद्धीकरणा’चा संबंध दलितांबाबतच्या अस्पृश्यता आणि अपमानाशी जोडत संबंधितांवर SC/ST कायद्यानुसार कारवाईची मागणी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला या कार्यक्रमाशी संबंधित व्यक्तींनी राहुल गांधी यांच्यावर जातीय रंग देण्याचा आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींविरोधात FIR दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला आता राजकीय संघर्षाबरोबरच कायदेशीर लढाईचेही स्वरूप प्राप्त झाले आहे.

Exit mobile version