Cauvery Water row : पाण्यावरून कर्नाटक-तामिळनाडूमध्ये पुन्हा वाद उफाळला ! सीएम विजयच्या चित्रपटाला फटका!

Cauvery Water row : कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाने कावेरी जल नियमन समितीच्या आदेशाला कायम ठेवला आहे. कर्नाटकला तमिळनाडूसाठी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.

Cauray Water Row

Cauray Water Row

Cauvery Water row : कावेरी नदीतील पाणीवाटपावरून ( Cauvery Water row) कर्नाटक व तामिळनाडू राज्यामध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाने कावेरी जल नियमन समितीच्या आदेशाला कायम ठेवला आहे. कर्नाटकला तमिळनाडूसाठी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरून आता कर्नाटकमधील शेतकरी व शेतकरी संघटनांनी आंदोलने सुरू केली आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय (Vijay ) यांचे पोस्टर कर्नाटकात जाळण्यात आले आहेत.


पाणी सोडण्याचा आदेश काय ?

कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाने कर्नाटकला 29 जुलैपासून 15 दिवस दररोज 3,500 क्युसेक पाणी तमिळनाडूला सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, दुष्काळी परिस्थितीचा हवाला देत कर्नाटकने या आदेशाविरोधात कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाकडे (Cauvery Water Management Authority) अपील केले होते. गुरुवारी दिल्लीत झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत कर्नाटकचा आक्षेप फेटाळण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वरच्या खोऱ्यातील राज्यांकडून पाणी सोडण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवणाऱ्या या सर्वोच्च संस्थेने कर्नाटकला कावेरी जल नियमन समितीच्या आदेशानुसार तमिळनाडूला पाणी सोडण्यास सांगितले. त्यावरून वाद सुरू झाला आहे.

कर्नाटकचा दुष्काळाचा दावा
कर्नाटकने प्राधिकरणासमोर दुष्काळाचा दावा मांडला आहे.राज्य सध्या गंभीर जलसंकटाचा सामना करत आहे. कावेरी खोऱ्यातील चारही प्रमुख जलाशयांमध्ये मिळणारा एकूण पाण्याचा प्रवाह 30 वर्षांच्या सरासरीपेक्षा 65.65 टक्क्यांनी कमी आहे. यासाठी ‘सुपर एल निनो’चा परिणाम कारणीभूत असल्याचे कर्नाटकने सांगितले. कर्नाटकने मागणी केली होती की CWRC चा पाणी सोडण्याचा आदेश आणखी 15 दिवस स्थगित ठेवावा आणि त्यानंतर बदललेल्या जलस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घ्यावा.

तमिळनाडूला दुहेरी फायदा: कर्नाटकचा युक्तिवाद
राज्यासाठी नैऋत्य मोसमी पाऊस हा पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. तर तमिळनाडूला आगामी ईशान्य मोसमी पावसाचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे तमिळनाडूला कर्नाटककडून सोडण्यात येणारे पाणी आणि ईशान्य मान्सून अशा दोन्हींचा फायदा होईल. कर्नाटकने असा दावा केला की, मागील वर्षांच्या पाणी सोडण्यामुळे तमिळनाडूकडे आधीच मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे.


पाणी सोडल्यास 7,000 क्युसेकपर्यंत वाढण्याची भीती

कर्नाटकने चिंता व्यक्त केली की, CWRC ने दररोज 3,500 क्युसेक पाणी सोडण्यास सांगितले असले तरी प्रत्यक्षात नदीपात्र कोरडे असल्याने बिळीगुंडलू मोजणी केंद्रापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी हे प्रमाण 7,000 क्युसेकपर्यंत वाढवावे लागू शकते.पावसाची कमतरता असताना मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यास राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या गरजांवर परिणाम होऊ शकतो. राज्याला पिण्यासाठी किमान 40 टीएमसीएफटी पाण्याची आवश्यकता असल्याचे कर्नाटकचे म्हणणे आहे.

तमिळनाडूची अधिक पाण्याची मागणी

तमिळनाडूने प्राधिकरणाने आपली मागणी वाढवत कर्नाटककडून दररोज 3,500 क्युसेकपेक्षा अधिक पाणी सोडण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. तमिळनाडूने आपल्या कावेरी खोऱ्यातील जलसंकटाचा उल्लेख करत पुढील 15 दिवसांसाठी 9.45 टीएमसीएफटी पाणी म्हणजेच दररोज 7,000 क्युसेक पाणी सोडण्याची मागणी केली.

कर्नाटकच्या जलाशयांमध्ये पाण्याची आवक वाढली
कर्नाटकातील चारही धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. कबिनी धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरत आहे. पुढील 15 दिवसांत कर्नाटकच्या धरणांमध्ये किमान 15 टीएमसी पाणी येण्याची शक्यता असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. कर्नाटकने 4.5 टीएमसी पाणी सोडले तरी राज्याच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजांवर परिणाम होणार नाही, असे प्राधिकरणाचा दावा आहे.


कावेरी पाणीवादाचा फटका विजय यांना

कावेरी पाणी वादाचा फटका तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजयच्या यांच्या जन नायकन’ चित्रपटाला बसला आहे. या चित्रपटाचे कर्नाटकातील प्रदर्शन थांबविण्यात आले आहे. तसेच आंदोलकांनी पोस्टर्स फाडले आहेत. कन्नड संघटनांच्या आंदोलनामुळे कर्नाटकातील अनेक ठिकाणी या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले.मंड्या येथे कन्नड कार्यकर्त्यांनी कावेरी पाणी प्रश्नावर आंदोलन करत चित्रपटगृहाबाहेरील ‘जन नायकन’चे पोस्टर्स फाडले. त्यानंतर थिएटर प्रशासनाने चित्रपटाचे शो रद्द केले आहेत.

कर्नाटक बंदची हाक
कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या मुद्द्यावरून कन्नड समर्थक संघटनांनी 13 ऑगस्ट रोजी कर्नाटक बंदची हाक दिलीय. कार्यकर्ते वटल नागराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बंदला राज्यातील सोळाशेहून अधिक कन्नड संघटना तसेच एक हजारपेक्षा अधिक इतर संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. कावेरी नदीचे पाणी कोणत्याही परिस्थितीत तामिळनाडूला सोडू नये, हीच आमची एकमेव मागणी आहे, वटल नागराज यांनी म्हटले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय हे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेण्यासाठी 3 ऑगस्टला बेंगळुरूला येणार आहेत. विजय यांच्या दौऱ्याला कन्नड संघटनांनी विरोध केलाय.

Exit mobile version