Deepfake Video : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर डीपफेक व्हिडिओ व्हायरल (Deepfake Video) होत आहेत. या तंत्रज्ञानाचा फटका प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिला बसला होता. तेव्हापासूनचा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता केंद्र सरकारनेही या प्रकारांची गंभीर दखल घेत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर जे कुणी असे डीपफेक व्हिडिओ अपलोड करत आहेत त्यांना सरकारने अल्टिमेटम दिल्यानंतर आता आणखी एक पाऊल टाकले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे नियम पाळावेत. तसेच प्रतिबंधित केलेल्या कंटेन्टची माहिती युजर्सना स्पष्टपणे द्यावी, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
Deepfake Video : ‘डीपफेक’ रडारवर! ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म्सना सात दिवसांची मुदत
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया कंपन्यांबरोबर घेतलेल्या बैठकीत या सूचना दिल्या. आयटीच्या नियमांनुसार प्रतिबंधित केलेल्या कंटेंटबाबत नियम 31 (1)(ब) अंतर्गत युजर्सना स्पष्ट भाषेत सूचना द्याव्यात. नोंदणीच्या वेळी आणि नियमित रिमाइंडर म्हणून तसेच लॉगइनच्या प्रत्येक वेळी, प्लॅटफॉर्मवर माहिती अपलोड किंवा सामायिक करताना माहिती दिली गेली पाहिजे. आयपीसी आणि आयटी कायदा 2000 सह दंडात्मक तरतुदी काय आहेत याची माहिती सोशल मीडिया कंपन्यांनी युजर्सना स्पष्टपणे द्यावी अशा सूचना सरकारने दिल्याचे मंत्री चंद्रशेखर यांनी सांगितले.
दरम्यान, याआधी डीपफेकबाबत केंद्राच्या माहिती तंत्रज्ञान धोरणानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्यांच्या धोरणांत बदल करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. भारतात इंटरनेट वापर करत असताना ज्या 12 प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे, त्यांचा वापर डीपफेकच्या माध्यमातून होऊ नये यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची सूचना केली होती. यासाठी सात दिवसांची मुदतही सरकारने दिली होती.
Israel Embassy परिसरात स्फोट; दिल्लीमध्ये खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू
पंतप्रधानांचा फेक व्हिडिओ व्हायरल झाला
गेल्या महिन्यात पीएम मोदींचा गरबा डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये पंतप्रधानांसारखी दिसणारी व्यक्ती काही महिलांसोबत गरबा करताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीत गरबा खेळतानाचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात होते. या दाव्याचा हा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर सरकारने डीपफेकबाबत अधिक गांभीर्याने कार्यवाही करण्यास सुरुवात केली. कंपन्यांची बैठक घेऊन त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. आता कंपन्या या सूचनांची अंमलबजावणी कशी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.