सरकारचा भाग असल्याची लाज वाटते; महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर मंत्री चिराग पासवान संतापले

BIHAR : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहारमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर संताप व्यक्त केला आहे.

News Photo   2026 09 27T171549.831

Chirag Paswan on Bihar Crime

बिहारमध्ये महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा (Bihar) एकदा ऐरणीवर आला आहे. जमुई आणि समस्तीपूरमधील घटनांनंतर आता बांका जिल्ह्यातील मंदार हिल परिसरातील तरुणीशी गैरवर्तनाचा कथित व्हिडीओ समोर आला आहे. सलग काही घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असताना सत्ताधारी एनडीएतील लोक जनशक्ती पक्ष रामविलासचे नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या घटनांवर बोलताना चिराग पासवान यांनी केवळ आरोपींना अटक करणं पुरेसं नसल्याचं स्पष्ट केलं. ज्या भागात अशा गंभीर घटना घडतात, त्या ठिकाणच्या संबंधित अधिकारी आणि प्रशासनाची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. बिहारमधील मुलींनी आपल्या राज्यातच असुरक्षित वाटणं ही गंभीर बाब असून सरकार या जबाबदारीपासून पळू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याशी चर्चा केल्याचंही सांगितलं आहे.

मुंबईच्या राम मंदिर परिसरात मध्यरात्री दुर्घटना, शौचालयातील रासायनिक वासाने गुदमरून दोघांचा मृत्यू

जमुईमध्ये 19 सप्टेंबरला कोचिंगवरून परतणाऱ्या अल्पवयीन मुलगा आणि मुलीला काही जणांनी अडवून गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली. त्यानंतर समस्तीपूरमध्येही अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा व्हिडीओ समोर आला आणि आरोपींना अटक करण्यात आली. या घटनांची चर्चा सुरू असतानाच बांका जिल्ह्यातील मंदार हिल येथील कथित प्रकार समोर आल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

सलग घटनांच्या पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. सत्ताधारी आघाडीचा भाग असूनही त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाईची गरज व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोपींवरील कारवाईसोबतच अशा घटना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची जबाबदारी निश्चित करण्याचा मुद्दा बिहारच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे.

Exit mobile version