बिहारमध्ये शिक्षक भरतीच्या 14 मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार; पाटण्यात आंदोलन चिघळलं, पोलिसांचा लाठीचार्ज
मौर्य हॉटेलजवळ पोलिसांनी आणखी एक बॅरिकेडिंग उभारून तेथे निमलष्करी दलाची तैनाती केली होती.
बिहारची राजधानी पाटणा येथील गर्दनीबाग (Bihar) परिसरात विद्यार्थी गेल्या 13 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. TRE-4 (शिक्षक भरती परीक्षा)च्या पॅटर्नमध्ये बदल करावा आणि शिक्षक भरतीशी संबंधित 14 कलमी मागण्या मान्य कराव्यात, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थी डाक बंगला चौकाच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी बॅरिकेडिंग करून त्यांना रोखले.
डाक बंगला चौकात विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची आणि झटापट झाली. पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर वॉटर कॅननचा मारा करण्यात आला, तसेच लाठीचार्जही करण्यात आला. वॉटर कॅननच्या माऱ्यात एक विद्यार्थिनी रस्त्यावर बेशुद्ध पडली. डीएसपी कोमल मीणा यांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसांना सूचना दिल्या आणि विद्यार्थिनीला वाहनातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी नेत्या खुशबू पाठक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थी आंदोलनातील पोलिसी कारवाईवरून राहुल गांधी आक्रमक; संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या
उपोषणाला बसलेले अमन यांना काही विद्यार्थी उचलून घेऊन आले. यावेळी अमन यांनी रडत रडत गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला. दरम्यान, सॅटेलाइट टाउनशिपला विरोध करणारे हजारो शेतकरीही अचानक जेपी गोलंबर परिसरात दाखल झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला साथ दिली. त्यामुळे आंदोलनाला आणखी मोठे स्वरूप आले.
मौर्य हॉटेलजवळ पोलिसांनी आणखी एक बॅरिकेडिंग उभारून तेथे निमलष्करी दलाची तैनाती केली होती. मात्र, विद्यार्थ्यांनी अवघ्या काही मिनिटांत हे बॅरिकेडिंग तोडून डाक बंगला चौकाच्या दिशेने कूच केले. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट घेण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांना शिष्टमंडळ तयार करण्याचे आवाहन करत हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेऊन जाण्याचे आश्वासन दिले.