हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड; परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा ठिय्या

परीक्षा प्रशासन यावर नेमका काय निर्णय घेते आणि सर्व परीक्षार्थींना समान संधी कशी दिली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Photo   2026 08 16T153137.140

नीट पेपरफुटीपासून स्पर्धा परीक्षांमधील (Neet) गैरप्रकार आणि तांत्रिक गोंधळाचा मुद्दा सातत्याने चर्चेत असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट लिपिक पदाच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होताच सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांची परीक्षा खोळंबली असून केंद्राबाहेर संतापाचे वातावरण निर्माण झाले.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज हायकोर्ट लिपिक पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील केंद्रावरही मोठ्या संख्येने परीक्षार्थी दाखल झाले होते. मात्र, परीक्षा सुरू होण्याच्या वेळेतच तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला सुरुवात करता आली नाही. दूरवरून परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना या अचानक उद्भवलेल्या समस्येचा फटका बसला.

परीक्षा रखडल्याने काही परीक्षार्थींनी केंद्रावर गोंधळ घालत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. परिस्थितीची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू असून तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. मात्र, परीक्षा पुन्हा घेतली जाणार की विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ दिला जाणार, याबाबत अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय समोर आलेला नाही.

परीक्षा केंद्राबाहेरच काही परीक्षार्थींनी ठिय्या दिल्याने प्रशासनासमोर आता मोठा पेच निर्माण झाला आहे. परीक्षेतील तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशी मागणी होत आहे. त्यामुळे परीक्षा प्रशासन यावर नेमका काय निर्णय घेते आणि सर्व परीक्षार्थींना समान संधी कशी दिली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us