बॉम्बे हायकोर्ट लिपीक परीक्षा गोंधळात; ‘हेच जंतर-मंतर’ म्हणत दीपके आंदोलनात
विद्यार्थ्यांची भूमिका ऐकल्यानंतर दीपके यांनी आंदोलनाला पाठिंबा देत विद्यार्थ्यांसोबत ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.
मुंबई हायकोर्टातील लिपीक पदासाठी (Paper leak) रविवारी (16 ऑगस्ट) राज्यभर घेण्यात आलेल्या टायपिंग परीक्षेला तांत्रिक अडचणींचे ग्रहण लागल्याचे चित्र अनेक परीक्षा केंद्रांवर पाहायला मिळाले. परीक्षा प्रक्रियेत आलेल्या अडथळ्यांमुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरली असून, परीक्षेच्या आयोजनावरच विद्यार्थ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. छत्रपती संभाजीनगरात या नाराजीचे रूपांतर थेट आंदोलनात झाले.
परीक्षेतील गोंधळाची माहिती मिळताच सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगरातील परीक्षा केंद्र गाठले. त्यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तांत्रिक कारणांमुळे परीक्षा सुरळीत पार पडली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी करत, परीक्षा पुन्हा घेण्यात यावी आणि भविष्यात अशा अडचणी निर्माण होऊ नयेत, अशी मागणी दीपके यांच्यासमोर मांडली.
दिपकेंच्या शाळा भेटीनंतर सीसीटीव्ही आले अन् पंखाही ; चोवीस तासांत हिंगोली झेडपीला खडबडून जाग !
विद्यार्थ्यांची भूमिका ऐकल्यानंतर दीपके यांनी आंदोलनाला पाठिंबा देत विद्यार्थ्यांसोबत ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. परीक्षा पुन्हा घेण्याबाबत ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे परीक्षा केंद्राबाहेरील विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक चर्चेत आले असून, त्याला संघटित स्वरूप मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दीपके यांनी ‘जोपर्यंत परीक्षा पुन्हा होईल, असे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मागे हटायचे नाही. मीदेखील तुमच्यासोबत असेल. आता हेच जंतर-मंतर,’ अशी भूमिका मांडली. काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यात त्यांनी ‘जंतर-मंतर आंदोलन सीझन 2’ची घोषणा लवकरच करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे संभाजीनगरातील आंदोलनाला त्यांच्या या घोषणेची जोड मिळाली आहे.
केवळ संभाजीनगरातच नव्हे, तर ज्या-ज्या परीक्षा केंद्रांवर गोंधळ किंवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवावे, असे आवाहनही दीपके यांनी केले आहे. त्यामुळे लिपीक पदाच्या टायपिंग परीक्षेतील तांत्रिक गोंधळ आता राज्यव्यापी आंदोलनाचे रूप घेणार का, परीक्षा पुन्हा घेतली जाणार का आणि प्रशासन यावर काय निर्णय घेणार, याकडे विद्यार्थ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.