Coldrif Syrup Ban : कोल्ड्रिफ सिरप पिऊन मध्य प्रदेशातील धिंदवाडा येथे 14 मुलांचा मृत्यू झाल्याने देशात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत कफ सिरप लिहून देणाऱ्या डॉ. प्रवीण सोनी यांना ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे आता मध्य प्रदेश सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरपच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. तामिळनाडूनंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि केरळनेही कोल्ड्रिफ कफ सिरपच्या वापरावर बंदी घातली आहे.
चाचण्यांमध्ये कफ सिरपमध्ये अत्यंत विषारी पदार्थ आढळून आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तमिळनाडूच्या औषध नियंत्रण संचालनालयाने अहवाल दिला आहे की, कोल्ड्रिफ सिपरमध्ये डायथिलीन ग्लायकोल (48.6% w/v) आहे, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. या आधारे, मध्य प्रदेश अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरात कोल्ड्रिफ विक्री थांबवण्याचे आणि त्याचा साठा जप्त करण्याचे आदेश दिले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव या घटनेला अत्यंत दु:खद म्हटले आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वसन देखील माध्यमांशी बोलताना दिले आहे. तसेच सिरप उत्पादक, स्रेसन फार्मास्युटिकल्सची इतर उत्पादने देखील चाचणी होईपर्यंत विक्रीतून मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाधित मुलांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
🚨 Three Indian states (Madhya Pradesh, Tamil Nadu and Kerala) have banned the sale and distribution of Coldrif cough syrup. pic.twitter.com/LPgE3YooBY
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) October 5, 2025
तर दुसरीकडे केंद्रीय औषध आणि औषध प्रशासन (CDSCO) ने सहा राज्यांमधील 19 औषध उत्पादन युनिट्सची जोखीम-आधारित तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (NIV), ICMR, NEERI, CDSCO आणि नागपूर येथील AIIMS च्या तज्ज्ञांसह तज्ज्ञांची टीम मृत्यूच्या कारणाचा तपास करत आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयालयाने म्हटले आहे.
सिरपचा तर्कसंगत वापर आणि औषधांच्या गुणवत्तेबाबत केंद्रीय आरोग्य सचिव सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिव/आरोग्य सचिव आणि औषध नियंत्रकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतील.
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) तामिळनाडू एफडीए (अन्न आणि औषध प्रशासन) ला ‘कोल्ड्रिफ’ सिरपच्या उत्पादकावर गंभीर गुन्ह्याखाली कठोर कारवाई करण्यात यावे अशी मागणी करणार आहे.