Download App

युद्धविराम झाला अन् काँग्रेसला सापडली नवी स्ट्रॅटेजी; 2016, 2019 मध्ये दडलीय खरी कहाणी..

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर (India Pakistan Ceasefire) यावर आता राजकारण सुरू झालं आहे.

India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर (India Pakistan Ceasefire) यावर आता राजकारण सुरू झालं आहे. काँग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 2016 आणि 2019 मधील सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमुळे भाजपला फायदा झाला होता. या गोष्टीची जाणीव काँग्रेसला (Congress Party) आहे. त्यामुळे आताच्या युद्धविरामाच्या अटी आणि अमेरिकेची मध्यस्थी या मुद्द्यांवर काँग्रेस नेते भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेसकडून सातत्याने केली जात आहे. काँग्रेसचे डावपेच भाजपच्या लक्षात येत नाही असे नाही. त्यामुळे काँग्रेसच्या या मागण्या कधीच पूर्ण होणार नाहीत याची खात्री आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) आणि या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवलेले ऑपरेशन सिंदूर यावर (Operation Sindoor) काँग्रेस सरकारच्या बाजूने उभी असल्याचे दिसत होते. पण युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर मात्र काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. युद्धविरामात अमेरिकेच्या भूमिकेवर फोकस करत युद्धविरामाचा तपशील मागितला. तसेच या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. अमेरिकेच्या मध्यस्थतेचा मुद्दा पुढे करून काँग्रेस सरकारची कोंडी करत असल्याचे वरवर दिसत असले तरी खरा उद्देश मात्र वेगळाच आहे.

खरंतर यामागे 2016 आणि 2019 मधील राजकीय कहाणी आहे. 2016 मध्ये उरी येथे दहशतवादी हल्ला झाला होता. याचा बदला घेण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) केली होती. 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्ट्राइक (Air Strike) केली होती. याचा फायदा भाजपला मिळाला होता. याच पद्धतीने ऑपरेशन सिंदूरचा फायदा भाजपला मिळतो की काय या भीतीने काँग्रेसला ग्रासले आहे.

ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवले. या मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवादी (Pakistan Occuoied Kashmir) अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईचे श्रेय घेण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे असे काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी याला काउंटर करण्यासाठी युद्धविरामात अमेरिकी मध्यस्थतेचा मुद्दा पुढे आणला आहे.

याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी पीएम मोदींना (PM Narendra Modi) चिठ्ठी लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. अचानक युद्धविराम का लागू करण्यात आला याचे उत्तर सरकारने द्यावे अशी मागणी काँग्रेस करत आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेच्या मध्यस्थतेच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी करण्याचा प्लॅन काँग्रेसने आखल्याचे दिसते. दोन्ही देशांत शस्त्रसंधी साठी डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) मध्यस्थता केली ही गोष्ट हैराण करणारी आहे असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. यातच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या नेतृत्वाची माहिती समोर आणली जात आहे.

काँग्रेस देतेय इंदिरा गांधींचे उदाहरण

युद्धविरामाची बातमी येताच काँग्रेस नेता पवन खेडा म्हणाले की आज देशाला इंदिरा गांधींची उणीव भासत आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीका केली. अशा पद्धतीने इंदिरा गांधींच नाव घेत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावर काँग्रेस मोदी सरकारला घेरत आहे. इंदिरा गांधींनी अमेरिकेचा दबाव झुगारून देत पाकिस्तानात सैन्य अभियान चालवले होते. यामुळे 1971 मध्ये पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेश नावाचा (Bangladesh) आणखी एक देश जगाच्या नकाशावर आला होता.

या निमित्ताने काँग्रेसकडून इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम सुरू आहे. या बरोबरच काँग्रेसने पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वदलीय आणि संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. या माध्यमातून इंदिरा गांधींचे धाडस आणि त्यांनी पाकिस्तानचे तुकडे केले या गोष्टी सभागृहात मांडून ऑपरेशन सिंदूरचा लाभ घेण्यापासून सरकारला रोखण्याचा काँग्रेसचा प्लॅन आहे.

ऑपरेशन सिंदूर : पीएम मोदीही देताहेत मेसेज

युद्धविरामाच्या दोन दिवसानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केले. सैन्याने पाकिस्तान आणि दहशतवादाला धडा शिकवल्याचे सांगितले. या सोबतच देश आणि जगालाही संदेश देताना दिसून आहे. पाकिस्तानला कठोर शब्दांत चांगलेच सुनावले. दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावरच पाकिस्तानशी चर्चा होईल असा संदेश अमेरिकेलाही दिला. यानंतर मंगळवारी सकाळी मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले. यामुळे पाकिस्तानने जी दिशाभूल करणारी माहिती पसरवली होती त्यावर पूर्णविराम लागला. इतकेच नाही तर भारताची एस 400 एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जात होता. अशात मोदींनी आपले विमान आदमपूर एअर बेसवर उतरवून जगासमोर पाकिस्तानची पोलखोल केली.

पाकिस्तानने कुत्र्यासारखं पायांमध्ये शेपूट घालून युद्धबंदीची भीक मागितली…अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्याने ‘टेरिरिस्तान’ची केली पोलखोल

भाजप काँग्रेसमध्ये शह काटशहाचा खेळ

पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला जे आश्वासन दिलं होतं ते सत्यात उतरवण्याचे काम भारतीय सैन्याने (Indian Army) केले. ऑपरेशन राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहिमेत सैन्याने पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे आणि 11 एअरबेस नष्ट करण्याबरोबरच 100 पेक्षा जास्त अतिरेकी आणि 50 पाकिस्तानी सैनिकांना मारले. यानंतर पाकिस्तानने युद्धविरामाची विनंती केल्यानंतरच भारत युद्धविरामासाठी तयार झाला.

पाकिस्तानला घायकुतीला आणल्यानंतर पीएम मोदी देश आणि जगाला वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे भाजप तिरंगा यात्रा काढून राजकीय वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. या गोष्टींचा विचार करून काँग्रेस अमेरिकेच्या मध्यस्थतेच्या मुद्द्यावर मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

follow us