Download App

काँग्रेसचा ऱ्हास कशामुळे झाला? राहुल गांधींच्या खास माणसानेच केली पीएचडी

चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री पंजाब विद्यापीठाचे रिसर्च स्कॉलर असलेल्या चरणजीत सिंग चन्नी यांना आता डॉक्टरेटची पदवी मिळाली आहे. त्यांनी नुकतेच राज्यशास्त्रमध्ये पीएचडी पूर्ण केली. दरम्यान, त्यांनी पीएचडी पूर्ण केली यापेक्षा त्यांनी पीएचडीसाठी निवडलेल्या विषयाची सध्या जास्त चर्चा होत आहे. ‘काँग्रेसच्या पतनाची कारणे’ असा विषय त्यांनी संशोधनासाठी निवडला होता. यात काँग्रेसची अधोगती ही पक्षातील शेपूट हालविण्याच्या आणि लाळ घोटण्याच्या संस्कृतीमुळे आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

काय म्हंटले आहे शोध प्रबंधात?

चन्नी यांनी आपल्या संशोधनात म्हटले की, काँग्रेसला वाचवण्यासाठी गांधी घराण्याने लढण्याचा प्रयत्न केला, मात्र काही लाळघोट्यांमुळे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचत गेले. चन्नी यांनी हे संशोधन पंजाब विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल एक्सक्लुजन अँड इनक्लुझिव्ह पॉलिसी’ च्या अंतर्गत केले आहे. या संशोधनासाठी त्यांना प्रा. इमॅन्युएल नहार यांनी मार्गदर्शन केले. माजी मुख्यमंत्री चन्नी यांचे हे संशोधन 2004 च्या लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत झालेल्या काँग्रेसच्या रणनीतीवर आधारित आहे. काँग्रेस सत्तेतून कशी बाहेर फेकली गेली हेही यात सांगण्यात आले आहे.

शेतकरी आंदोलनावेळी मोदी सरकारने ट्विटरला धमकावलं; माजी सीईओच्या दाव्याने खळबळ!

चन्नी यांनी संशोधनात राज्यांमधील काँग्रेसमधील गटबाजीचाही उल्लेख केला असून प्रत्येक राज्यात काँग्रेस ३ गटात विभागली गेली असल्याचे सांगितले आहे. उदाहरण देताना सांगितले की, पंजाबमध्ये काँग्रेसच्या राजवटीत कॅप्टन अमरिंदर सिंग, सिद्धू आणि सुनील जाखड यांच्यात बाचाबाची झाली होती, तर राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात संघर्ष झाला होता. यात त्यांनी मध्य प्रदेशातील सिंधिया यांच्यासह 18 आमदारांची बंडखोरी आणि कमलनाथ सरकारचे सत्तेतून बाहेर फेकले जाणे याचाही उल्लेख केला आहे. याशिवाय छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि टीएस सिंह देव यांच्यातील संघर्षाचा उल्लेख चरणजित सिंह चन्नी यांच्या प्रबंधात करण्यात आला आहे.

संशोधनात 2009 मध्ये यूपीएच्या विजयाचे कारण स्पष्ट करताना असेही म्हटले की नरेगा, आरटीआय आणि इतर सामाजिक कार्यक्रमांमुळे काँग्रेस सत्तेत आली. तर 2011 मध्ये अण्णा आंदोलन आणि केजरीवाल सारख्या लोकांनी काँग्रेसचे खूप नुकसान करायला सुरुवात केली. 2 जी स्पेक्ट्रम, आदर्श सोसायटी घोटाळ्यासारख्या मुद्द्यांमुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली. काही राज्यांमध्ये काँग्रेसने दुसऱ्या फळीतील लोकांना उभे राहू दिले नाही. सोनिया गांधी यांचे लक्ष केवळ पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर राहिले, तर राहुल गांधी हे तरुणांपुरते मर्यादित होते, असाही निष्कर्ष चन्नी यांनी काढला आहे.

Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली!

एनडीएची सत्ता येण्याची कारणे सांगताना चन्नी म्हणाले की, २०१४ मध्ये भाजपचा प्रचार आक्रमक होता. भाजपकडे पंतप्रधान मोदींसारखा चेहरा होता, तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकले नाहीत. महागाई आणि लोभी भ्रष्ट राजकीय वर्गाविरुद्ध मध्यमवर्गात संताप होता. काँग्रेसला आता पुन्हा सत्तेत आणण्यासाठी संघटना मजबूत करावी लागेल, असे चन्नी यांनी आपल्या सूचनेमध्ये म्हटले आहे. रणनीतीचा पुन्हा आढावा घ्यावा लागेल आणि जुन्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याऐवजी जनतेला मान्य असलेला करिष्माई चेहरा शोधावा लागेल, अशाही सुचना त्यांनी दिल्या आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज