Download App

काँग्रेसला मोठा धक्का : कार्यकारी अध्यक्षाचा तीन आमदारांसह भाजपच्या सरकाराला थेट पाठिंबा

गुवाहटी : आसाममध्ये काँग्रेसमध्ये (Congress) मोठा धक्का बसला आहे. करीमगंज उत्तरचे आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा देत थेट भाजप (BJP) सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्यासोबतच मंगलदोईचे आमदार बसंता दास, नागांवचे आमदार शशी कांता दास आणि करीमगंज दक्षिणचे आमदार सिद्दीक अहमद यांनीही भाजप सरकारला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. (Congress MLAs Basanta Das, Kamalakhya Dey Purkayastha, Sashi Kanta Das and Siddique Ahmed have extended their support to bjp)

यानंतर माध्यमांशी बोलताना कमलाख्या डे पुरकायस्थ म्हणाले, मी राज्याच्या विकासासाठी भाजपला पाठिंबा देत आहे. यासाठी मी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. काँग्रेसमध्ये राहून भाजप सरकारला पाठिंबा देणार आहे. पुरकायस्थ यांच्यासोबतच दास यांनीही पत्रकार परिषद घेत काँग्रेसमध्ये राहून भाजप सरकारला उघड पाठिंबा दर्शवला. मिळालेल्या माहितीनुसार, पुरकायस्थ आणि दास आणि भाजप आमदार पिजूष हजारिका लवकरच मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेणार आहेत.

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होणार? बैठकीत गेलेल्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

काँग्रेस आमदारांच्या या भुमिकेबाबत बोलताना मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, आज काँग्रेसचे दोन आमदार बसंता दास आणि कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी आसाम सरकारला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी काँग्रेसच्या शशी कांता दास आणि सिद्दीक अहमद या दोन आमदारांनीही भाजपला पाठिंबा दिला होता. आतापर्यंत काँग्रेसच्या चार आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला आहे.

येत्या काही दिवसांत विरोधी पक्षाचे सर्व आमदार सरकारला पाठिंबा देतील. यामुळे आसाम हे एक असे राज्य होईल जिथे सर्व आमदार राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठिंबा देतील. आता, पंतप्रधान मोदी आसाममध्ये करत असलेल्या कामामुळे लोक खूप आनंदी आहेत.राज्य सरकार देखील विकासात्मक कामे करण्याचा प्रयत्न करत आहे, हे दुहेरी इंजिन सरकार आहे, असाही दावा त्यांनी केला.

follow us