Brij Bhushan Singh Sexual Harassment Case : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच भाजपच्या खासदाराला मोठा धक्का बसला आहे. कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंच्या (Female wrestler) लैंगिक शोषणाप्रकरणी राऊज एवेन्यू कोर्टाने आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, ब्रिजभूषण यांचे सचिव विनोद तोमर यांच्याविरोधातही आरोप निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Harassment Case) न्यायालयाच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या काळातच भाजपला मोठा धक्का बसला आहे.
दोघांवरही आरोप निश्चित
हे आदेश देताना राऊज एवेन्यू कोर्याने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये, कलम (354) महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळजबरी करणे. (कलम 354- अ)लैंगिक छळ आणि कलम 506 (गुन्हेगारी धमकी) या कलमांतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, त्यांचे सचिव विनोद तोमर यांच्यावर कलम 506 (1) अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे पुरावे असल्याचे म्हटले आहे.
कुस्तीपटूंनी केलं होतं आंदोलन
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात 15 जून 2023 रोजी दिल्ली पोलिसांनी कलम 354, 354-अ, आणि कलम 506 अंतर्गत आरोपपत्र दाखल केलं होतं. या प्रकरणात ब्रिजभूषण यांच्यावर सहा कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्याच आधारावर ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. त्याचबरोबर, दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह 30 पेक्षा अधिक कुस्तीपटूंनी आंदोलन केलं होतं.
कोर्टाने अर्ज फेटाळून लावला होता
या प्रकरणात तक्रारदारांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात यावा यासाठी सुप्रीम कोर्टात गेले होते. त्यावर दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टाला एफआयआर नोंदवण्यात आल्याचं कळवलं होतं. तसंच, तपास सरू असल्याचंही सांगितलं होतं. दरम्यान, 26 एप्रिल रोजी या प्रकरणाचा पुढील तपासासाठी दाखल केलेला ब्रिजभूषण यांचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला होता.