भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाने (Cyclone Michaung) धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवाळामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये आभाळा फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली, विमानतळ बुडाले आहेत. तर दक्षिण दिशेच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. विशेषत: दिल्लीवरुन धावणाऱ्या गाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे, विमानसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. (Cyclone ‘Michong’ has caused huge damage on the south coast of India)
या वादळाच्या तडाख्याने मुसळधार पाऊस होत असून या पावसामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करत मदतीचे आश्वासन दिले आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीजवळ दाखल झाल्याने मुसळधार पाऊस होत आहे. आता आज हे वादळ आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) किनारपट्टीवर धडकू शकते. आज नेल्लोर ते मछलीपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
पण या विनाशकारी चक्रीवादळला ‘मिचॉन्ग’ हे नाव का देण्यात आले, त्याचा अर्थ काय होतो? हे नाव कोणी सुचविले असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. यापूर्वी आलेल्या अनेक वादळांना अशीच वेगवेगळी नावे देण्यात आली होती. त्यामुळे ही नावे नेमकी कोण सुचविली होती? आणि चक्रीवादळांचे नामकरण कसे होते? असाही सवाल उपस्थित होत आहे.
तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश व्यतिरिक्त ओडिशाला फटका बसविणाऱ्या या चक्रीवादळाला ‘मिचॉन्ग’ हे नाव देण्यात आले आहे. या शब्दाचा अर्थ ताकद आणि कणखरता असा होतो. हा एक म्यानमार शब्द आहे. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन (WMO) नुसार, Michaung हे नाव म्यानमारने दिले आहे आणि म्यानमारच्या भाषेत त्याला Migjaum म्हणतात. याच अर्थ ताकद आणि लवचिकता आहे. हे चक्रीवादळ अत्यंत ताकदीने आणि वेगाने मोठ्या प्रमाणात नुकसान करणारे असल्याने याला मिचॉन्ग हे नाव देण्यात आले आहे.
आयएमडीने तीन डिसेंबर रोजी नैऋत्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली होती. तर दुसऱ्या दिवशी चक्रीवादळ तामिळनाडू किनारपट्टीवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार तामिळनाडू किनारपट्टीवर परिणामही झाला.
‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाने तामिळनाडूमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवाळामुळे तामिळनाडूमध्ये आभाळा फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली, विमानतळ बुडाले आहेत. तर दक्षिण दिशेच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. विशेषत: दिल्लीवरुन धावणाऱ्या गाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे, विमानसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या वादळाच्या तडाख्याने मुसळधार पाऊस होत असून या पावसामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
धोक्याचा इशारा तातडीने देता यावा आणि वादळांची नेमकी ओळख असावी उद्देशाने काही वर्षांपूर्वीपासून वादळांना नाव देण्याचे ठरवले गेले. जागतिक हवामान संघटना आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन (ESCAP) चे सदस्य देश जगभरात उद्भवणाऱ्या प्रत्येक चक्रीवादळासाठी नावे सुचवतात. यात भारत, येमेन, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान, इराण, कतार, UAE, थायलंड, सौदी अरेबिया, ओमान आणि मालदीव असे एकूण 13 देश आहेत.
हे देश त्यांच्या देशातील प्रथा, पंरपरा लक्षात घेऊन कोणत्याही समुदाच्या भावना दुखावणार नाहीत या सर्व गोष्टी लक्षात घेऊन छोट्या, लक्षात राहण्यासारख्या आणि अर्थ असणाऱ्या नावांची यादी तयार करतात. यानुसार इंग्रजी अद्याक्षरांनुसार सर्व देशांची यादी तयार केली जाते. त्यांनी सुचवलेली 13 नावे 13 रकान्यांमध्ये मांडली जातात. नव्याने तयार होणाऱ्या चक्रीवादळाला रकान्यातील देशांच्या क्रमानुसार एकापाठोपाठ एक नाव देण्यात येते. 13 देशांनी सुचवलेल्या पहिल्या नावांचा रकाना संपला की दुसऱ्या रकान्यातील नावे क्रमवारीनुसार देण्यात येतात.
भारताकडून आतापर्यंत लहर, मेघ, सागर, वायू अशी काही नावे दिली गेली आहेत. सर्व देशांनी सुचविलेली नावे 2020 मध्ये संपली होती. त्यानंतर सर्व देशांकडून नव्याने नावे मागविण्यात आली होती. या यादीमध्ये भारताने गती, तेज, मुरासू, आग, व्योम, झोर, प्रोबाहो, नीर, प्रभंजन, घुरनी, अंबुड, जलाधी आणि वेग अशी 13 नावे सुचविण्यात आली आहे. एकदा एक नाव दिले की त्याची पुनरावृत्ती होत नाही. ज्या वादळांचा वेग कमीत कमी 63 किलोमीटर प्रतितास आहे अशा वादळांनाच नावे देण्यात येतात.
ऑक्टोबर महिन्यात अरबी समुद्रातून ‘तेज’ नावाचे वादळ निर्माण झाले होते. हे नाव भारताने दिले होते. आधी ते भारतातील गुजरातच्या किनारपट्टीच्या भागात धडकण्याची शक्यता होती, परंतु नंतर ते ओमान आणि येमेनच्या दिशेने वळले होते. त्याआधी जून महिन्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळाला बांगलादेशने नाव दिले होते. या शब्दाचा अर्थ आपत्ती असा होता. बिपरजॉयने गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखौ बंदरावर धडक मारली होती, यामुळे बराच विध्वंस झाला होता. बंगालच्या उपसागरातून सात मे रोजी निर्माण झालेल्या वादळाला ‘मोका’ असे नाव देण्यात आले. मोका भारताच्या किनारी भागाकडे सरकत असतानाच ते म्यानमारला धडकले. मोका हे नाव यमनने सुचवले होते.