अंधश्रद्धेचा काळोख माणसाच्या विवेकाला कसं गिळून टाकतो, याचं अंगावर काटा आणणारं उदाहरण कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यात समोर आलंय. (Karnatak) ज्या आईने जन्म दिला, वाढवलं, त्याच आईचा एका ज्योतिषाच्या शब्दावर विश्वास ठेवून पोटच्या मुलीने जीव घेतला. हे केवळ हत्याकांड नव्हतं, तर एका सुशिक्षित मेंदूचा ज्योतिषाने केलेला ‘ब्रेन वॉश’ होता.
या धक्कादायक कथेची सुरुवात दीड वर्षापूर्वी झाली. 33 वर्षीय सुचित्राचं तिच्या वडिलांवर जीवापाड प्रेम होते. जेव्हा दीड वर्षापूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा ती पूर्णपणे कोलमडून गेली. वडिलांचा मृत्यू नैसर्गिक होता की त्यामागे काहीतरी काळं-बेरं आहे, या शंकेने तिला ग्रासले होते. हीच अस्वस्थता तिला एका ज्योतिषाकडे घेऊन गेली आणि तिथूनच या विनाशाचा मार्ग सुरू झाला.
स्वतःला भविष्यवेत्ता म्हणवणाऱ्या त्या ज्योतिषाने सुचित्राला अशा काही गोष्टी सांगितल्या ज्याची कल्पनाही कुणी केली नसेल. ज्योतिषाने दावा केला की, तुझ्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नाही, तर तुझ्या आईने केलेल्या काळ्या जादूमुळे आणि जादूटोण्यामुळे झाला आहे. सुचित्राच्या मनात आधीच वडिलांच्या मृत्यूचं दुःख होतं, त्यात ज्योतिषाने ओतलेल्या या विषारी माहितीमुळे तिच्या मनात स्वतःच्या आईबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला. ज्या आईने तिला मायेने लहानाचं मोठं केलं, तीच आई तिला आपल्या वडिलांची ‘खाटीक’ वाटू लागली.
कॅनरा बँकेच्या मॅनेजरकडून 90 वर्षाच्या वृद्धाला गंडवण्याचा डाव, प्लॅन लिक होताच भांडाफोड
सूडाच्या भावनेने पेटलेल्या सुचित्राने 55 वर्षीय आई पुष्पावती यांना संपवण्याचा कट रचला. एक दिवस संधी साधून ती आईच्या घरी गेली. रात्री जेव्हा आई गाढ झोपेत होती, तेव्हा सुचित्राने त्यांच्या चेहऱ्यावर उशी ठेवून जोरात दाबली. काही क्षण पुष्पावती यांनी मृत्यूशी झुंज दिली असेल, पण पोटच्या मुलीच्या हातांचा विळखा सुटला नाही. अखेर श्वास कोंडून पुष्पावती यांचा मृत्यू झाला. आपली आई आता कायमची शांत झाली आहे, हे पाहून सुचित्राने पुरावे नष्ट करण्याची तयारी सुरू केली.
हत्या केल्यानंतर सुचित्राने आरडाओरडा करण्याऐवजी अत्यंत थंड डोक्याने हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवलं. वयोमानानुसार आईचा मृत्यू झाला आहे, असे सांगून तिने अंत्यसंस्काराची घाई सुरू केली. मात्र, पुष्पावती यांच्या शरीरावरील काही खुणा आणि सुचित्राची वागणूक पाहून गावातील लोकांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. जेव्हा पोलिसांनी सुचित्राला आपल्या स्टाईलने प्रश्न विचारले, तेव्हा तिचा संयम सुटला आणि तिने ज्योतिषाने सांगितलेली ती ‘भयंकर’ कहाणी आणि केलेला खून कबूल केला.
आज सुचित्रा पोलिसांच्या कोठडीत आहे. एका ज्योतिषाच्या फसव्या शब्दांनी एका हसत्या-खेळत्या कुटुंबाची राखरांगोळी केली. पोलीस आता त्या ज्योतिषाचा कसून शोध घेत आहेत, ज्याने सुचित्राला या कृत्यासाठी प्रवृत्त केलं. तसेच, या कटात सुचित्राच्या पतीचा काही सहभाग आहे का? याचाही तपास सुरू आहे. अंधश्रद्धेपोटी रक्ताच्या नात्यात ओतलं गेलेलं हे विष समाजासाठी धोक्याची घंटा आहे.
