Download App

दिल्लीत राजकीय भूकंप! आठ आमदारांची आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी; केजरीवालांवर खापर

सत्ताधारी आम आदमी पार्टीला जोरदार झटका बसला आहे. एकाच वेळी पक्षाच्या तब्बल आठ आमदारांनी अरविंद केजरीवाल यांची साथ सोडली आहे.

Delhi Assembly Elections : राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीची (Delhi Assembly Elections) धामधूम सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच आता दिल्लीच्या राजकारणात भूकंप घडवणारी घडामोड घडली आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टीला जोरदार झटका बसला आहे. एकाच वेळी पक्षाच्या तब्बल आठ आमदारांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची साथ सोडली आहे.

विधानसभा निवडणुकीत आठ आमदारांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यामुळे हे आमदार नाराज झाले होते. केव्हाही पक्ष सोडतील अशी शक्यता होती. घडलेही तसेच या आठ आमदारांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये पालममधून भावना गौड, त्रिलोकपुरीतून रोहित महरौलिया, जनकपुरीतून राजेश ऋषी, कस्तूरबा नगरमधून मदनलाल, बिजवासन येथून बीएस जून, आदर्शनगर येथून पवन शर्मा, मादीपूर येथून गिरीश सोनी आणि महरौली येथून नरेश यादव यांनी आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी दिली आहे.

अरविंद केजरीवालांनी औकातीत रहावे..नाना पटोलेंचा इशारा

आम आदमी पार्टीने यंदा वेगळी रणनीती आखली आहे. काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे विद्यमान आमदार नाराज झाले आहेत. पालम मतदारसंघातून आमदार भावना गौड यांनी सांगितले की मी आजिबात नाराज नाही. परिस्थिती काय आहे याची मला चांगली जाणीव आहे. मी हरियाणातून येऊन दिल्लीत स्थायिक झाले. दिल्लीत पाच वर्षे नगरसेवक तर दहा वर्षे आमदार आहे. पालमच्या नागरिकांची प्रामाणिकपणे सेवा केली. त्यामुळे आता मला उमेदवारी नाकारण्यात आली असली तरी मला त्याचं दुःख वाटत नाही.

पण मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की ज्या विचारसरणीला घेऊन आम आदमी पक्ष आला आज त्याच पक्षाच्या संयोजकांन असा चष्मा घातलाय की त्यांना त्यांचे जवळचे लोक जे दाखवतात तेच दिसत आहे. त्यामुळे माझी नाराजी त्यांच्याशी आहे असेही भावना गौड म्हणाल्या.

आमदारांचा भाजपावरही आरोप

आम आदमी पक्षाच्या आठ आमदारांनी निवडणुकीच्या आधीच राजीनामा दिला आहे. पक्षाने या निवडणुकीत अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे. यानंतर या आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. भाजपातून आलेल्या अनिल झा यांना पक्षाने किरारी मतदारसंघातून तिकीट दिले आहे. यासाठी विद्यमान आमदार ऋतुराज गोविंद यांचे तिकीट कट करण्यात आले.

केजरीवाल, CM अतिशी अन् सिसोदियांसाठी इलेक्शन टफ; ‘आप’च्या शिलेदारांची कोंडी!

या राजकारणावर गोविंद यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपने माझ्याशीही अनेकदा संपर्क केला होता. त्यांनी अनेक प्रकारची प्रलोभनेही दाखवली. परंतु, मी त्यांना नकार दिला होता. केजरीवाल यांनी मला दोन वेळेस संधी दिली. आमचे काही सहकारी भाजपाच्या प्रभावात येऊन असे काही करत आहेत. पण इतिहास त्यांना कधीच माफ करणार नाही असे आमदार गोविंद म्हणाले.

follow us