Delhi High Court On Sonam Wangchuk : प्रत्येक नागरिकाचे जीवन मौल्यवान आहे आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे ही सरकारची जबाबदारी आहे अशी टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची गंभीर दखल घेत केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचुक अनिश्चितकालीन उपोषणावर बसलेले आहे. मात्र त्यांच्या या उपोषणाची दखल सरकारन घेत नसल्याने आता दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात गंभीर दखल घेतली आहे.
तसेच सरकारी डॉक्टरांनी वांगचुक (Sonam Wangchuk) यांची दररोज वैद्यकीय तपासणी करावी आणि त्यांच्या आरोग्यावर नियमितपणे लक्ष ठेवावे असे आदेश देखील दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) दिले आहे. तर वांगचुक यांच्या आरोग्याची दररोज काळजीपूर्वक तपासणी केली जात असल्याची माहिती केंद्र सरकारने न्यायालयात दिली आहे.
तर दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात राकेश कुमार सैनी (Rakesh Kumar Saini) यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती डी.के.उपाध्याय (D.K. Upadhyay) आणि न्यायमूर्ती तेजस कारिया (Tejas Karia) यांच्या खंडपीठाने वांगचुक यांच्या प्रकृतीची गंभीर दखल घेतली आहे. राकेश कुमार सैनी यांनी या याचिकेत केंद्र आणि दिल्ली सरकारला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे आणि त्यांना जीव वाचवणारी काळजी, आपत्कालीन उपचार आणि आवश्यक पोषण पुरवण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. तसेच जर परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्यांना जबरदस्तीने अन्न भरवण्याची परवानगी घ्यावी अशीही विनंती करण्यात आली आहे.
‘भूतम भयम्’साठी करण सोनावणे शिकला मालवणी भाषा
9 किलो वजन घटले
सोनम वांगचुक यांच्या उपषोणाचा आज 19 वा दिवस असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. माहितीनुसार, 18 दिवसांत त्यांचे वजन 8.9 किलोने घटून आता 57.15 किलोवर आले आहे. डॉक्टरांच्या मते, ते पूर्णपणे शुद्धीवर असले तरी या उपोषणामुळे त्यांच्या अंतर्गत अवयवांवर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. मात्र असं असून देखील आतापर्यंत केंद्र सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने सोशल मीडियावर केंद्र सरकारवर जोरदार टिका होताना दिसत आहे. तसेच आता विरोधक देखील या प्रकरणात सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे.
