नवी दिल्ली : सोशल मीडियामध्ये आपण सहजासहजी हॅशटॅग, कीवर्ड वापरत असतो. अनेक कंपन्या जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यावेळी वेगवेगळे हॅशटॅग, कीवर्ड वापरले जातात. परंतु अशाच एका व्यावसायिक प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने (Delhi Highcourt) गुगला (Google) मोठा दणका दिलाय. बाथरूम फिटिंग्ज उत्पादक कंपनी हिंदवेअरच्या (Hindware) ट्रेडमार्क (Trade Mark) हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल 30 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. प्रतिस्पर्धी कंपन्यांना “हिंदवेअर” हा शब्द जाहिरातींसाठी कीवर्ड म्हणून वापरण्याची परवानगी गुगलने दिली होती. या प्रकरणात कंपनीच्या ट्रेडमार्क हक्कांचे उल्लंघन झाल्याचे निकाल न्यायालयाने दिला आहे. (delhi-high-court-fines-google-₹30-lakh-for-using-trademark-as-advertising-keyword-hindware)
गुगलने हिंदवेअरची परवानगी न घेता प्रतिस्पर्धी कंपन्यांना ‘हिंदवेअर” हा शब्द जाहिरात कीवर्ड म्हणून वापरण्याची मुभा दिली. हे हिंदवेअरने वर्षानुवर्षे कमावलेल्या प्रतिष्ठेचा “मोफत फायदा घेण्यासारखे” असल्याचे न्यायालयाने म्हटले. न्यायमूर्ती मिनी पुष्करणा यांनी 22 मे रोजी दिलेल्या 163 पानी निकालात गुगलला आठ आठवड्यांच्या आत दंडाची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच “हिंदवेअर” किंवा त्यास “सॅनिटरीवेअर”सारख्या शब्दांसोबत जोडून तयार केलेले कोणतेही शब्दसमूह जाहिरातींचे कीवर्ड म्हणून वापरण्यास बंदी घातली आहे. हिंदवेअर ब्रॅण्डनेम आहे. गुगलवर कोणी सॅनिटरी म्हणून सर्च करत नाही. हिंदवेअर सर्च केले जाते. त्यावेळी हिंदवेअर दिसले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
विना अनुदानित कॉलेजांना सावत्र वागणूक का?’ डॉ. सुधाकर जाधवर यांचा पुणे विद्यापीठाच्या बैठकीत सवाल
गुगलकडे हिंदवेअरची कोणतीही मालकी हक्क नाही
गुगल केवळ निष्क्रिय डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून काम करत नाही. उलट ते कीवर्ड सुचवते, अल्गोरिदमद्वारे जाहिरातींचे स्थान ठरवते आणि बोली प्रक्रियेद्वारे ट्रेडमार्कची जाहिरातक्षमता विकते. त्यामुळे कीवर्ड म्हणून ट्रेडमार्कचा वापर हा गुगलचाच वापर मानला जाऊ शकतो. गुगलकडे ‘हिंदवेअर’ या ट्रेडमार्कवरील कोणताही मालकी हक्क नाही. तसेच त्या ट्रेडमार्कची व्यावसायिक प्रतिष्ठा प्रतिस्पर्ध्यांना विकण्याचा कोणताही परवाना त्यांच्याकडे नाही. तरीही हा ट्रेडमार्क कीवर्ड म्हणून सूचीबद्ध करून आणि त्याची लिलावाद्वारे विक्री करून गुगल त्याचा स्वतःच्या व्यावसायिक मालमत्तेसारखा वापर करत आहे, असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. नोंदणीकृत ट्रेडमार्क प्रतिस्पर्धी कंपन्यांना विकून गुगल महसूल कमावते. मात्र त्या ट्रेडमार्कची प्रतिष्ठा निर्माण करण्यात तिचा कोणताही वाटा नसतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व ट्रेडमार्क मालकाच्या संमतीशिवाय केले जाते.
‘सेफ हार्बर’ संरक्षणही नाकारले
माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील कलम 79 अंतर्गत ऑनलाइन मध्यस्थांना (Intermediaries) मिळणारे ‘सेफ हार्बर’ संरक्षण मिळावे, असा दावा गुगलने केला होता. मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला आहे. जाहिरातींमधून उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदेशीर उल्लंघनासाठी संबंधित जाहिरातदार जबाबदार आहेत आणि प्लॅटफॉर्म म्हणून त्यांना जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद गुगलकडून करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही. हिंदवेअरचा ट्रेडमार्क प्रतिस्पर्ध्यांना महसुलासाठी विकणे हेच गुगलने आवश्यक दक्षता न घेतल्याचे पुरावे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
मूळ प्रकरण काय होते ?
हिंदवेअरने ग्रोहे इंडिया, ओमकारा इन्फोवेब, सेरा सॅनिटरीवेअर, गुगल इंडिया आणि गुगल एलएलसी यांच्याविरोधात दोन स्वतंत्र दावे दाखल केले होते.
ओमकारा इन्फोवेब आणि सेराने “हिंदवेअर” हा ट्रेडमार्क जाहिरात कीवर्ड म्हणून खरेदी केला होता. त्यामुळे वापरकर्त्यांनी “हिंदवेअर” शोधल्यास सर्वप्रथम सेराच्या वेबसाइटकडे वळवले जात होते. त्याचप्रमाणे ग्रोहेने “हिंदवेअर सॅनिटरी” आणि “हिंदवेअर सॅनिटरीवेअर” यांसारखे कीवर्ड विकत घेतले होते, ज्यामुळे त्यांच्या वेबसाइट्स वरती दिसत होत्या. सुनावणीदरम्यान ग्रोहे, ओमकारा इन्फोवेब आणि सेरा यांनी हिंदवेअरसोबत तडजोड केली. त्यामुळे या प्रकरणात गुगल इंडिया आणि गुगल एलएलसी हेच एकमेव प्रतिवादी उरले होते. त्यामुळे अखेरीस न्यायालयाने गुगलविरोधात हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निर्णयामुळे भारतातील डिजिटल जाहिरात उद्योग, ट्रेडमार्क संरक्षण आणि ऑनलाइन जाहिरात धोरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
