Kailash Gehlot Resigns : दिल्लीत लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधीच सत्ताधारी आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली सरकारमधील परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कैलास गेहलोत यांनी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांना पत्र लिहून निर्णयाची माहिती दिली आहे. मंत्रिपदाबरोबरच गेहलोत यांनी पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. राजीनामा का देत आहोत याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मोठे आरोप करत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी या निर्णयाची माहिती लोकांना दिली आहे. पुढील वर्षात फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्याआधीच कैलास गेहलोत यांनी हा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम निवडणुकीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मोठी बातमी! एअर इंडियाच्या मुंबई-न्यूयॉर्क विमानाला बॉम्बस्फोटाची धमकी, विमान दिल्लीकडे वळवलं
— Kailash Gahlot (@kgahlot) November 17, 2024
आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली त्यावेळी कैलास गेहलोत यांच्या नावाचीही चर्चा होती. परंतु, केजरीवाल यांनी आतिशी यांना मुख्यमंत्री केलं. ज्यावेळी केजरीवाल तुरुंगात होते त्यावेळी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यासाठी उपराज्यपालांनी कैलास गेहलोत यांचीच निवड केली होती. आता गेहलोत यांनीच पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी या निर्णयांमागील कारणांचा उहापोह केला आहे.
मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. तसेच मंत्रिपद आणि आमदारकी मिळाली. यासाठी धन्यवाद. आज पक्ष अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड देत आहे. यमुना नदी साफसफाई करण्याचं वचन आम्ही दिलं होतं परंतु, पूर्ण करता आलं नाही. आता यमुना नदी आधीपेक्षा जास्त प्रदूषित झाली आहे.
शीशमहल सारखे बरेच वाद समोर आले आहेत. यामुळे लोकांच्या मनात पक्षाबद्दल संशय निर्माण झाला आहे. लोकांच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्याऐवजी आम्ही राजकीय अजेंड्यासाठी लढत आहोत हे दुःखदायक आहे. दिल्लीतील जनतेच्या गरजा पूर्ण करण्याच्या आमच्या क्षमतांवर यामुळे निश्चितच परिणाम झाला आहे. आमचा बहुतांश वेळ केंद्र सरकारबरोबर वाद घालण्यात जात आहे. यामुळे शहराचा विकास होणार नाही.
..तर विधानसभा निवडणुकीत मी भाजपचा प्रचार करेन, अरविंद केजरीवालांचे पीएम मोदींना आव्हान
मी दिल्लीतील लोकांची सेवा करण्याचं वचन देत राजकारणाची सुरुवात केली होती. यावरच मी पुढील वाटचाल करू इच्छितो. याच कारणामुळे आता मला आम आदमी पक्षातून बाहेर पडण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे मी आता आम आदमी पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे कैलास गेहलोत यांनी सांगितलं.