DGCA’s strict instructions for photography on airport : आजकाल अनेकांना नवीन ठिकाणी गेल्यावर सेल्फी काढण्याची, रिल्स बनवण्याची किंवा ट्रॅव्हल ब्लॉग शूट करण्याची सवय असते. मात्र, तुम्ही एअरपोर्टवर देखील अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा फोटो काढत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आता एअरपोर्ट परिसरात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीबाबत कडक नियम लागू करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड, मोबाईल जप्ती आणि अगदी विमानप्रवासावर बंदीची देखील कारवाई होऊ शकते.
प्रवाशांमध्ये वाढत्या सोशल मीडिया ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या नव्या नियमांनुसार एअरपोर्टमधील अनेक संवेदनशील आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या भागांमध्ये कोणतीही परवानगी न घेता फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
डीजीसीएच्या निर्देशांनुसार सुरक्षा तपासणी केंद्र, बोर्डिंग गेट परिसर, रनवे बस, विमान हाताळणी क्षेत्र, एअरपोर्ट एप्रन तसेच इतर ऑपरेशनल भागांमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे. या भागांमध्ये नियम मोडताना आढळल्यास संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई केली जाऊ शकते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढताना आढळल्यास संबंधित प्रवाशावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये मोबाईल फोन जप्त केला जाऊ शकतो, तसेच पुढील चौकशीसाठी संबंधित व्यक्तीला ताब्यातही घेतले जाऊ शकते.
पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन, महाराष्ट्रात पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
इतकेच नाही, तर नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्यास संबंधित प्रवाशाचे नाव डीजीसीएच्या ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये समाविष्ट करण्याची शिफारसही केली जाऊ शकते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काही काळासाठी किंवा कायमस्वरूपी विमानप्रवासावर बंदी घालण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. गेल्या काही वर्षांत एअरपोर्टमधून तयार करण्यात येणारे ट्रॅव्हल व्लॉग, रील्स आणि बिहाइंड-द-सीन्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. मात्र, अशा व्हिडिओंमधून अनेकदा सुरक्षा व्यवस्था, कर्मचाऱ्यांच्या हालचाली आणि निगराणी यंत्रणेशी संबंधित संवेदनशील माहितीही नकळतपणे रेकॉर्ड होते.
याच पार्श्वभूमीवर एअरपोर्टची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणि संवेदनशील माहिती सार्वजनिक होण्यापासून रोखण्यासाठी डीजीसीएनेने हे कठोर पाऊल उचलल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढच्या वेळी एअरपोर्टवर सेल्फी किंवा रील बनवण्यापूर्वी संबंधित नियमांची माहिती घेणे आणि त्यांचे पालन करणे अत्यावश्यक ठरणार आहे.
