CBSE New Decision on Obesity : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या (CBSE) शाळांमध्ये आता ऑयल बोर्ड (Oil Board) झळकलेले दिसतील. याचबरोबर हेल्दी लाइफस्टाइलला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. सीबीएसईने या संदर्भात शाळांना एक परिपत्रक पाठवले आहे. यात शाळा प्रमुखांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. याआधी शाळांमध्ये शुगर बोर्ड लावण्यच्याही सूचना सीबीएसईने दिल्या होत्या. आता शाळांमध्ये ऑयल बोर्ड लावण्यात येणार आहे. हा निर्णय घेण्यामागे नेमका काय उद्देश आहे? यात मुलांना काय सूचना आहेत याची माहिती जाणून घेऊ या..
या निर्णयामागे महत्वाचा उद्देश म्हणजे रोजच्या आहारात खाद्यतेलाचं प्रमाण किती असलं पाहिजे याबाबत जागरुक करण्याचं आहे. सध्याच्या फास्टफूडच्या काळात लहान वयातच लठ्ठपणाची समस्या निर्माण झाली आहे. मुलांमध्ये लठ्ठपणा (Obesity in Children) वाढत चालला आहे. यामागे अनेक कारणे आहेत. त्यात फास्टफूडचे अतिसेवन, तळलेले पदार्थ वारंवार खाणे अशा काही गोष्टींमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा निर्माण झाला आहे.
यासंदर्भात सीबीएसईने शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. स्कूल कॉमन एरियामध्ये डिजिटलसह अन्य फलक लावावेत. यामध्ये खाद्यतेलांच्या अतिसेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती द्यावी अशा सूचना आहेत.
मुलांच्या आरोग्यासाठी CBSE चा मोठा निर्णय; देशभरांतील शाळांत आता शुगर बोर्ड
सरकारी कागदपत्रे, नोटपॅड, लेटरहेड यांसह अन्य कागदपत्रांवर हेल्दी लाइफस्टाइलशी संबंधित संदेश छापून घ्या अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळे लोकांत जागरुकता निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
सीबीएसईने परिपत्रकात म्हटले आहे की विद्यार्थ्यांनी पायऱ्या चढणे तसेच त्यांना पायी चालण्यासाठी शाळांना प्रोत्साहन द्यावे. पौष्टिक आहार आणि व्यायामाला प्रोत्साहन देणे, जंकफूडचे सेवन कमी करणे आणि पौष्टिक खाद्यपदार्थांचे प्रमाण आहारात वाढवणे याबाबतीतही सीबीएसईने सूचना दिल्या आहेत. आता सीबीएसईच्या या सूचनांचे शाळा किती पालन करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सीबीएसईने नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे (NFHS) 5 2019-20 आणि लॅन्सेट जीबीडी 2021 च्या अहवालांचा उल्लेख केला आहे. NFHS च्या अहवालात म्हटले आहे की देशात लठ्ठपणा वाढत चालला आहे. प्रत्येक पाच माणसांत एक जण या समस्येने ग्रासला आहे. तर लॅन्सेटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की सन 2021 मध्ये भारतात तब्बल 18 कोटी लोक लठ्ठ होते. याच हिशोबाने विचार केला तर 2050 मध्ये देशात 44.90 कोटी लोक लठ्ठपणाच्या विळख्यात अडकलेले असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. हा अहवाल याच वर्षात प्रकाशित झाला आहे.
भाषावाद निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या अन् पोरांच्या शाळा कोणत्या?; वाचा अन् मगच राजकारण करा…