Rajouri Encounter: जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (terrorist) झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. धरमसालच्या बाजीमल भागात ही चकमक झाली. राजौरीमध्ये सध्या गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलांनी (Indian Army) परिसराची घेराव आणि शोध मोहीम तीव्र केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे उधळून लावण्यासाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज आहे. मात्र, राजौरी जिल्ह्यातील बाजीमल भागात दोन दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन जवान शहीद झाले. तर दोन जवान जखमी झालेत.
ASK SRK : ‘डंकी’च्या रिलीजपूर्वीच शाहरुख खानची मोठी घोषणा! हाऊसफूल…
या ठिकाणी अजूनही चकमक सुरू असून जवान दहशतवाद्यांना कडवी झुंज देत आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे अनेकवेळा घडले आहे.
जम्मूचे आयजी आनंद जैन यांनी सांगितले की, राजौरीतील कालाकोट भागातील धरमसाल पोलिस स्टेशनच्या सोल्की गावातील बाजी माल भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर घेराव घालण्यात आला. दहशतवाद्यांनी येथे गोळीबार सुरू केला असून प्रत्युत्तराची कारवाई केली जात आहे. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका जवानाची प्रकृती गंभीर आहे.
जम्मू-काश्मीरमधील पीर पंजालचे जंगल गेल्या काही वर्षांत अनेक चकमकींनंतर सुरक्षा दलांसाठी आव्हान ठरले आहे. भारताच्या भौगोलिक स्थितीचा आणि घनदाट जंगलांचा फायदा घेऊन दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. गेल्या आठवड्यात राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.