रिलायन्समुळे PF चे 1800 कोटी बुडाले; तुमच्या PF खात्यातील पैशांचं काय होणार?

EPFO कोट्यवधी नोकरदारांच्या PF चे व्यवस्थापन करणाऱ्या ईपीएफओला मोठा आर्थिक फटका बसलाय. याचा पीएफ खातेधारकांवर काय परिणाम होणार?

EPFO Loss 1800 Cr In Reliance Capital Investment

EPFO Loss 1800 Cr In Reliance Capital Investment

EPFO Loss 1800 Cr : देशातील कोट्यवधी नोकरदारांच्या भविष्याची आर्थिक तरतूद करणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. रिलायन्स कॅपिटलमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून EPFO ला तब्बल 1,816.22 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे, या पैशांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा समावेश होता. कंपनीच्या दिवाळखोरी प्रक्रियेनंतर आता उर्वरित रक्कम वसूल करण्याचे कायदेशीर मार्गही संपल्याची माहिती EPFO ने आपल्या विश्वस्तांना दिली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. पण या नुकसानाचा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या PF खात्यावर परिणाम होणार का? तुमच्या खात्यातील पैसे सुरक्षित आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

EPFO ने किती कोटींची गुंतवणूक केली होती?

प्रकाशित वृत्तांनुसार 2013 आणि 2014 या वर्षांमध्ये EPFO ने रिलायन्स कॅपिटल लिमिटेडच्या नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्समध्ये (NCDs) 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, कालांतराने कंपनीची आर्थिक परिस्थिती बिघडली आणि कंपनीला ही रक्कम परतफेड करण्यात अपयश आलं. या मूळ गुंतवणुकीवर 808.67 कोटी रुपयांचं व्याज जमा झालं. त्यामुळे EPFO ची एकूण थकबाकी 3,308.67 कोटी रुपयांवर पोहोचली होती. मात्र, कंपनीच्या दिवाळखोरी प्रक्रियेनंतर EPFO ला संपूर्ण रक्कम परत मिळू शकली नाही.

1,816 कोटी रुपयांचं नुकसान नेमकं कसं झालं?

रिलायन्स कॅपिटलविरोधात रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2021 मध्ये दिवाळखोरी निवारण प्रक्रिया सुरू केली.  एनसीएलटीने फेब्रुवारी 2024 मध्ये हिंदुजा समूहाशी संबंधित इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्जचा निवारण आराखडा मंजूर केला. मार्च 2025 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. या प्रक्रियेतून EPFO ला केवळ 1,492.45 कोटी रुपये परत मिळाले. या नुकसानीचा हिशोब पाहिला तर… मूळ गुंतवणूक 2,500 कोटी रुपये, जमा झालेलं व्याज 808.67 कोटी रुपये, एकूण थकबाकी 3,308.67 कोटी रुपये, परत मिळालेली रक्कम 1,492.45 कोटी रुपये असे सगळं गणित केलं तर, मूळ गुंतवणुकीतील 1,007.55 कोटी रुपये आणि त्यावर मिळणारं 808.67 कोटी रुपयांचं व्याज असे 1,816.22 कोटी रुपये EPFO ला मिळू शकलेलं नाही.

पैसे परत मिळण्याची आशा आहे का?

या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांचीही चौकशी सुरू असून, आरोप सिद्ध झालेले नाहीत. ऑगस्ट 2026 मध्ये CBI ने उर्वरित रकमेच्या कथित हेराफेरीप्रकरणी अनिल अंबानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात निधीच्या कथित गैरव्यवहारासाठी कोण जबाबदार आहे, याचा तपास केला जात आहे. मात्र, कंपनीची दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पैसे परत मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे EPFO समोर आता या आर्थिक नुकसानीचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

कर्मचाऱ्यांच्या PF खात्यातील पैसे सुरक्षित आहेत का?

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे EPFO च्या या आर्थिक नुकसानीचा थेट परिणाम नोकरदारांच्या PF खात्यावर होणार का? तर, उपलब्ध वृत्तानुसार, या गुंतवणुकीतील नुकसानीमुळे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक PF खात्यातून थेट पैसे कापले जाणार नाहीत. म्हणजेच, रिलायन्स कॅपिटलमधील गुंतवणुकीत झालेल्या नुकसानीचा अर्थ असा नाही की, कर्मचाऱ्यांच्या खात्यातील जमा रक्कम कमी केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या PF खात्यांमधील शिल्लक आणि EPFO च्या गुंतवणुकीतील नुकसान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे EPFO ला रिलायन्स कॅपिटलमधील गुंतवणुकीत मोठा आर्थिक फटका बसला असला, तरी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. या नुकसानीमुळे त्यांच्या वैयक्तिक PF खात्यातील जमा रक्कम सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version