Download App

आयुष्मान भारत योजनेतील रुग्णालयांत ESIC कामगारांनाही मिळणार उपचार; प्रस्ताव अंतिम टप्प्यात

आयुष्मान भारत पॅनलमध्ये सहभागी असणाऱ्या रुग्णालयांत ईएसआयसी लाभार्थी संघटीत क्षेत्रांतील कामगारांना उपचार घेता येतील.

New Delhi : आयुष्मान भारत पॅनलमध्ये सहभागी (Ayushman Bharat) असणाऱ्या देशभरातील 24 हजारांपेक्षा जास्त रुग्णालयांत कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) लाभार्थी संघटीत क्षेत्रांतील कामगार तसेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सदस्यांना उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. श्रम मंत्रालयाने ईएसआयसी (ESIC) अंतर्गत आरोग्य सुविधांना आधिक दर्जेदार आणि सुलभ बनवण्याच्या उद्देशाने आयुष्मान भारत पॅनलमधील रुग्णालयांत ईएसआयसी लाभार्थींना कॅशलेस उपचार मिळण्याच्या प्रस्तावाला अंतिम रुप दिले आहे.

सामाजिक सुरक्षेसह संघटीत क्षेत्रातील कामगार तसेच त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबातील सदस्यांना चांगले उपचार मिळावेत हे जास्त महत्वाचे आहे. बऱ्याचदा पैशांअभावी या लोकांना महागडे उपचार घेता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहतात. केंद्र सरकारलाही या गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे सरकारने या कामगारांसाठी आयुष्मान भारत योजनेतील रुग्णालयांना ईएसआयसीशी जोडण्याची तयारी केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना केंद्रीय श्रम मंत्री डॉ. मनसुख मंडाविया म्हणाले, देशातील सुदूर क्षेत्र आणि शहरी भागातील कामगारांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या प्रस्तावाला अंतिम रुप देऊन अंमलात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही करुन यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.

मृतांच्या नावे लाभार्थी, 9 लाख जणांचा एकच मोबाईल नंबर; आयुष्मान भारत योजनेत मोठा भ्रष्टाचार?

साडेचौदा कोटी लाभार्थ्यांना फायदा

ईएसआयसी अंतर्गत मार्च 2024 पर्यंत 3.72 कोटी संघटीत क्षेत्रातील कामगारांची संख्या आहे. कामगारांवर अवलंबून असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना धरून ही संख्या 14.44 कोटी इतकी होते. या सर्वांसाठी चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

सद्यस्थितीत एका कामगाराच्या परिवाराची सरासरी संख्या 3.88 आहे. या हिशोबाने लाभार्थ्यांची संख्या 14 कोटींपेक्षा जास्त आहे. या लाभार्थ्यांना आता आयुष्मान भारत योजनेतील रुग्णालयात उपचार घेता येतील. यासाठी त्यांना कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. सर्व उपचार कॅशलेस होतील.

ईएसआयसी अंतर्गत लाभार्थ्यांच्या उपचार खर्चाला कोणतीही मर्यादा नाही. लाभार्थ्याच्या उपचाराचा सर्व खर्च ईएसआयसी करेल. आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळतात. सध्या 60 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने ईएसआयसी कामगारांसाठी घेतलेला हा निर्णय लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आयुष्मान कार्ड असूनही उपचारांसाठी पैसे मोजावे लागतात; हेमा मालिनींचा भाजपला घरचा आहेर

follow us