ChatGPT-DeepSeek Ban : अर्थ मंत्रालयाने मोठी घोषणा करत त्यांच्या कर्मचाऱ्यांना अधिकृत कामासाठी चॅटजीपीटी (ChatGPT) आणि डीपसीक (DeepSeek) सारख्या एआय टूल्सचा (AI Tools) वापर टाळण्यास सांगितले आहे. चॅटजीपीटी आणि डीपसीक सारख्या एआय टूल्समुळे सरकारी कागदपत्रे आणि डेटाच्या गोपनीयतेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) आपल्या कर्मचाऱ्यांना चॅटजीपीटी आणि डीपसीक सारख्या एआय टूल्सचा वापर टाळण्यास सांगितले आहे.
माहितीनुसार, ऑफिस कंप्यूटर आणि इतर डिव्हाईसमध्ये एआय टूल्स आणि अँप्स (चॅटजीपीटी, डीपसीक इ.) सरकारी डेटा आणि कागदपत्रांच्या गोपनीयतेला धोका निर्माण करू शकतात त्यामुळे अर्थ मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाचा निर्णय 29 जानेवारीचा आहे. पण त्याच्या अंमलबजावणीची बातमी आज (बुधवार) समोर आली आहे. याच बरोबर ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन देखील भारतात येऊन आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्याची माहिती देखील समोर आली आह.
भारत तयार करणार स्वतःचे एआय मॉडेल
आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी गेल्या आठवड्यात भारत देखील स्वतःचा एआय मॉडेल तयार करण्याची योजना तयार करत असल्याची माहिती दिली होती. भारतात तयार केलेले मूलभूत मॉडेल जगातील सर्वोत्तम मॉडेल्सशी स्पर्धा करू शकतील.
आपण हे मॉडेल्स खूप कमी वेळात तयार करू शकतो. काही महिन्यांतच आपल्याकडे जागतिक दर्जाचे मूलभूत एआय मॉडेल असेल. असं आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते.