CM Siddaramaiah : म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) मधील जमीन वाटप घोटाळ्याशी संबंधित न्यायालयाच्या निर्देशानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध म्हैसूर लोकायुक्त स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार म्हैसूर लोकायुक्तमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला चुकीच्या पद्धतीने 14 भूखंड वाटप केल्याच्या आरोपांची लोकायुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
एफआयआरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आरोपी क्रमांक 1 आणि त्यांची पत्नी पार्वती सिद्धरामय्या यांचा आरोपी क्रमांक 2 असा उल्लेख करण्यात आला आहे तर बमैदा मल्लिकार्जुन आरोपी क्रमांक 3, देवराजू आरोपी क्रमांक 4 असा उल्लेख करण्यात आला आहे.
माहितीनुसार, या प्रकरणात तीन महिन्यांच्या आता चौकशी पूर्ण करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने लोकायुक्तांना दिले आहेत. त्यामुळे आता मुडा जमीन घोटाळ्याबाबत अधिकृतपणे एफआयआर दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने सीआरपीसी अंतर्गत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार सीआरपीसी अंतर्गत सिद्धरामय्या यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले असून मात्र कोणत्या कलमा अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला याबाबत माहिती समोर आलेली नाही. तक्रारदार आरटीआय कार्यकर्ते स्नेहमोयी कृष्णा यांच्या तक्रारीवरून न्यायालयाने सीएम सिद्धरामय्या यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले.
विधानसभेपूर्वी काँग्रेसचा मोठा निर्णय, 13 नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, ‘हे’ आहे कारण
तर दुसरीकडे या प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बेंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना जर त्यांनी वैयक्तिकरित्या काही गुन्हा केला असेल तर त्याला ते स्वतः जबाबदार आहेत, परंतु त्यांनी असा कोणताही गुन्हा केलेला नाही असा त्यांचा विश्वास आहे. त्याची बदनामी केली जात आहे. पक्षाची बदनामी होत आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं सांगितले.