Kolkata Fire : कोलकात्यात हॉटेलला आग; नऊ जणांचा मृत्यू

Kolkata Fire : कोलकात्यातील फ्री स्कूल स्ट्रीटवरील एका हॉटेलला लागलेल्या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

Kolkata Fire

Kolkata Fire

Kolkata Fire : कोलकात्यातील फ्री स्कूल स्ट्रीटवरील एका हॉटेलला लागलेल्या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, मंगळवारी पहाटे 2 च्या सुमारास ही आग लागली. आग हॉटेलमध्ये वेगाने पसरली आणि संपूर्ण परिसरात धूर पसरला होता. अग्निशमन दलाचे मुख्यालय जवळच असल्याने, कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहुण्यांना सुरक्षित बाहेर काढले. नऊ जणांना कलकत्ता मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृतांमध्ये पुरुष, महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. पोलीस सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग (Kolkata Fire) लागल्याची सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि कर्मचाऱ्यांनी इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिड्यांचा वापर करून हॉटेलच्या खिडक्या उघडल्या आणि आत अडकलेल्या लोकांची सुटका करून त्यांचे प्राण वाचवले. कोलकात्यातील फ्री स्कूल स्ट्रीटवर अनेक हॉटेल्स आहेत, जिथे बांगलादेशातील पर्यटक अनेकदा मुक्काम करतात.

सहा जण जखमी

पोलिसांनी सांगितले की, या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे हॉटेलमध्ये आगीपासून सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना नव्हत्या अशी देखील माहिती समोर येत आहे.  या घटनेच्या काही काळापूर्वीच पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ येथील चार मजली हॉटेलला सोमवारी पहाटे भीषण आग लागली होती. त्या दुर्घटनेतही नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version