नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘इंडिया’ (India) आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला शिवसेना (UBT), आम आदमी पक्षासह 12 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसला तरी याच नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीची चौथी बैठक नुकतीच दिल्लीत पार पडली. यामध्ये जागावाटपासह इतर बाबींवर चर्चा करण्यात आली. याचवेळी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबतची चर्चा झाली. (Former Congress president Rahul Gandhi and JDU chief, Bihar Chief Minister Nitish Kumar out of PM race)
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या या खेळीने काँग्रेसचे नेते, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि जेडीयुचे प्रमुख, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा गेम केला असल्याची चर्चा आहे. यापूर्वी राहुल गांधी आणि नीतीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी रेसमध्ये असल्याचे बोलले जात होते. नितीश कुमार यांच्या पुढाकारातूनच इंडिया आघाडी अस्तित्वात आली होती. एप्रिल 2023 मध्ये त्यांनी आघाडीतील घटकपक्षांना पाटण्यात एकत्र आणले होते. सर्वांना एकत्र घेऊन बसू शकणारा नेता म्हणून त्यांना ओळखले जात होते. भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टक्कर देऊ शकेल, देशभरात ओळख असेल असा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. नीतीश कुमार यांनीही वाराणसीमधून प्रचाराचा नारळ फोडत या गोष्टींचे एक प्रकारे संकेत दिले होते.
तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस प्रत्येक बैठकीत राहुल गांधींना पुढे करत होती. राहुल गांधींनीही आतापर्यंतच्या चारही बैठकांमध्ये सहभाग नोंदविला होता. बैठकीतील रणनीतीत देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय खुद्द राहुल गांधींनीच ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) हे नाव सुचवले. या प्रस्तावाला सर्वपक्षीयांनी मान्यताही दिली. यापूर्वी त्यांना सिरीयस नसलेला राजकारणी म्हणून हिणवले जात होते. या प्रतिमेला भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून त्यांनी तडा देण्याचा प्रयत्न केला. देशभरात त्यांनी स्वतःची एक प्रतिमा उभी केली.
मात्र आता अचानकपणे ममता बॅनर्जी यांनी खर्गे यांचे नाव पुढे केले आहे मात्र पंतप्रधानपदाबद्दल मल्लिकार्जुन खर्गे यांना विचारले असता त्यांनी अगदी स्पष्टपणे विजयावरच लक्ष केंद्रीत करणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, आधी निवडणुकीत विजय महत्वाचा आहे. मगच चर्चा होईल. त्यामुळे आधी आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, मग खासदार लोकशाही पद्धतीने निर्णय घेतील. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनाच लढावे लागेल. पुढे कसे काम करायचे हे सर्वांनी ठरवले. सर्व पक्षांनी 8-10 जाहीर सभा घेण्याचे ठरवले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्या 12 पक्षांनी खर्गे यांच्या नावाला पसंती दर्शविली त्यात शिवसेना (UBT) चाही समावेश आहे. इतकचे नाही तर या नावाची निवड करण्यामागे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. सोमवारी दिल्लीत आलेल्या उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जींनी केजरीवाल यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली. दोघांची ही भेट म्हणजे शिष्टाचाराची भेट असल्याचे सांगितले जात होते. पण याच तीन भेटींनंतर मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी बैठकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून खर्गे यांचे नाव सुचविले. त्यावेळी शिवसेना (UBT), आपसहित 12 प्रमुख पक्षांनी लगेचच या प्रस्तावाला पाठिंबा दिला.