Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि बंडखोर नेते जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांनी आता भाजपला नवा अल्टिमेटम दिला आहे. तिकीट नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेट्टर यांनी तिकीट न दिल्यास पक्षाच्या सुमारे दोन डझन जागा कमी होतील, असे म्हटले आहे. शेट्टर यांनी भाजप (BJP) हायकमांडला 15 एप्रिलपर्यंत तिसऱ्या यादीतील तिकिटे जाहीर करण्यास सांगितले आहे. त्याची मुदत आज संपणार आहे. सहा वेळा आमदार राहिलेल्या शेट्टर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
2012 मध्ये भाजप सरकारचे 305 दिवस मुख्यमंत्री राहिलेल्या जगदीश शेट्टर यांना भाजप हायकमांडने हुबळी-धारवाड मतदारसंघ सोडण्यास सांगितले होता. त्यांना निवडणूक लढू नका असे सांगितले होते, परंतु शेट्टर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आता त्यांना तिकीट नाकारले तर पक्षाला 20 ते 25 जागांचे नुकसान होईल, असे शेट्टर यांनी म्हटले आहे. शेट्टर यांना हुबळी-धारवाड मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवायची आहे. एकीकडे पक्ष हायकमांडला आव्हान देत असतानाच दुसरीकडे त्यांनी आपल्या समर्थकांची बैठकही बोलावली आहे. शेट्टरही पक्ष सोडण्याची शक्यता आहे.
शेट्टर यांनी अखेर रविवारपर्यंत थांबण्यास सांगितले आहे. भाजपकडून तिकीट न मिळाल्यास पुढील निर्णय घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटकातील कित्तूर येथील शेट्टर हे एक प्रभावी नेते आहेत. चार दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या शेट्टर यांना मार्गदर्शक मंडळात पाठवण्याची योजना पक्षाने आखली होती. जे शेट्टर मान्य करायला तयार नाहीत. हुबळी-धारवाडच्या काही नगरसेवकांनी शेट्टर यांच्या समर्थनार्थ राजीनामा देऊ केला आहे.
नगरसेवकांशी बोलून मगच निर्णय घेऊ, असे शेट्टर यांनी सांगितले. शेट्टर यांच्या बंडखोरीमुळे आता भाजपच्या तिसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्ष शेट्टर यांच्यापुढे झुकतो की नाही हे पाहायचे आहे. 224 सदस्यीय विधानसभेत भाजपने 212 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. केवळ 12 जागांची घोषणा होणे बाकी आहे. यामध्ये हुबळी धारवाड सीटचाही समावेश आहे.