Download App

रस्ते अपघातातील जखमींना मिळणार मोफत उपचार : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : भारतात रस्ते अपघातात (Road accidents) बहुतांश मृत्यू हे उपचाराला उशीर झाल्यामुळे होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता हीच गंभीर बाब लक्षात घेऊन मोदी सरकार (Modi Government) रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना संपूर्ण देशभरात मोफत उपचाराची सुविधा लागू करणार आहे. अपघातानंतर तातडीने आणि चांगले उपचार मिळावे, यासाठी ही व्यवस्था केली जाणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना याबाबतचे संकेत दिले. (Free treatment facility will be implemented across the country during golden hour for those injured in road accidents)

रस्ते अपघातातील जखमींना गोल्डन अवरमध्ये लवकरात लवकर आणि चांगले उपचार मिळावे यासाठी यापूर्वीच मोटार वाहन कायद्यात बदल करण्यात आले होते. यानुसार काही राज्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध देखील आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये या तरतुदीची अंमलबजावणी केली जात नाही. मात्र अनुराग जैन यांनी आता ही व्यवस्था संपूर्ण देशात लागू करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. एका आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 4 लाख 46 हजार रस्ते अपघात झाले होते. यात 4 लाख 23 लाख लोक जखमी झाले आणि 1 लाख 71 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

Cyclone Michaung मुळे दक्षिणेत दैना; पण चक्रीवादळांचे ‘नामकरण’ कसे होते अन् कोण करते?

चार महिन्यांत सुविधा सुरू होणार :

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, गोल्डन अवरमध्ये मोफत आणि कॅशलेस वैद्यकीय उपचाराचा नियम मोटार वाहन कायद्यात समाविष्ट आहे. काही राज्यांमध्ये हा नियम पाळला जात आहे. पण आता ही व्यवस्था संपूर्ण देशात लागू करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण देशात कॅशलेस उपचार प्रणाली लागू करण्याचे आवाहन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला केले आहे. येत्या ४ महिन्यांत संपूर्ण देशात ही सुविधा लागू केली जाण्याची शक्यता आहे.

गोल्डन अवरमध्ये तुम्ही कुठेही उपचार घेऊ शकता :

मोटार वाहन कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपघातात जखमी झालेल्यांवर तातडीने जवळच्या रुग्णालयात मोफत आणि चांगले उपचार करण्यात यावेत अशी तरतूद आहे. अपघातानंतर पहिल्या काही तासांत उपचार उपलब्ध झाले तर अनेकांचे प्राण वाचविता येऊ शकतात. अपघातानंतरचे पहिले काही तास गोल्डन अवर म्हणून ओळखले जातात. या वेळेत जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आणि त्याला तातडीने उपचार मिळून जगण्याची शक्यता वाढते.

INDIA Alliancne : भाजप विजयाचे ‘इंडिया’ला धक्के! उद्याच्या बैठकीकडे नितीशकुमारांची पाठ

4 लाखांहून अधिक अपघात, 4.23 लाख जखमी, 1.71 लाख लोकांचा मृत्यू :

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, 2022 मध्ये 4,46,768 रस्ते अपघात झाले. त्यापैकी 4,23,158 लोक जखमी झाले आणि 1,71,100 लोकांचा मृत्यू झाला होता. एकूण रस्ते अपघातांपैकी 45.5 टक्के अपघात दुचाकींमुळे झाले आहेत. तर 14.1 टक्के अपघात कारमुळे झाले होते. यातही सर्वाधिक अपघात अतिवेगाने झाले होते. यात 1 लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अहवालानुसार, रस्ते अपघात हे गावांमध्ये जास्त झाले आहेत.

शाळा, महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षा अभ्यासक्रम राबविण्यात येणार :

रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी सरकार शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम राबवणार आहे. याशिवाय, भारत एनसीएपी देखील राबविण्यात येत आहे. यामध्ये सीट बेल्ट रिमाइंडर आणि वाहनांमधील तांत्रिक बदल यांचा समावेश आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज