INDIA Alliancne : भाजप विजयाचे ‘इंडिया’ला धक्के! उद्याच्या बैठकीकडे नितीशकुमारांची पाठ
INDIA Alliance Meeting : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत तेलंगणाचा अपवाद वगळता अन्य चार राज्यांत काँग्रेसने (Election Results 2023) सपाटून मार खाल्ला. राजस्थान आणि छत्तीसगडसारखी मोठी राज्ये काँग्रेसच्या पंजातून निसटली. मध्य प्रदेशातही वाईट अवस्था झाली. विधानसभा निवडणुकीत इतकं मोठं अपयश का आलं याचं चिंतन सुरू असतानाच काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीलाही (INDIA Alliancne Meeting) दणके बसू लागले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेत उद्या इंडिया आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. मात्र त्याआधीच एक बॅड न्यूज आली आहे. या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) सहभागी होणार नाहीत अशी माहिती मिळाली आहे. त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते या बैठकीत हजर राहणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.
MP Election : चिप असलेली मशीन ‘हॅक’ होऊ शकते’ दिग्विजय सिंहांचा ‘EVM’वर गंभीर आरोप
या बैठकीसाठी जेडीयूतर्फे राष्टीय अध्यक्ष ललन सिंह आणि मंत्री संजय झा उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आजारी आहेत. त्यामुळे सोमवारी त्यांच्या उपस्थितीत होणारा जनता दरबारही रद्द करण्यात आला होता. आज बिहार मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीला मात्र नितीश कुमार उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जर कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहू शकतात तर इंडिया आघाडीच्या बैठकीला का नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. नितीश कुमार इंडिया आघाडीत नाराज असल्याच्या बातम्या याआधीही आल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा आघाडीला अडचणीत टाकण्याचा विचार केल्याचे या घडामोडींवरून दिसून येत आहे.
इंडिया आघाडीची पहिली बैठक 23 जून रोजी पाटना शहरात झाली होती. दुसरी बैठक बंगळुरू येथे झाली होती. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी तिसरी बैठक मुंबईत झाली होती. यानंतर समन्वय समितीच्या बैठका नियमित होत आहेत. आता चौथी मोठी बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पाच राज्यांतील निवडणुकीचा मुद्दाही चर्चेत राहणार आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाणा आणि मिझोरम राज्यांतील निवडणुकीत काँग्रेस लढली. मात्र इंडिया आघाडीतील अन्य पक्षांची यात फारशी भूमिका नव्हती.
इंडिया आघाडीत मिठाचा खडा, ममता बॅनर्जींनी केला काँग्रेसवर हल्लाबोल
अखिलेश नाराज, ममतांचाही मिठाचा खडा
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव इंडिया आघाडीवर नाराज आहेत. त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली होती. मध्य प्रदेशच्या निवडणुकीत सपाला काही जागा देण्यास काँग्रेस नेते कमलनाथ यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. त्यामुळे अखिलेश यादव कमालीचे नाराज झाले होते. अजूनही त्यांची नाराजी कायम आहे. आता उद्याच्या बैठकीत ते हजर राहतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जीही संतापल्या आहेत. इंडिया आघाडीच्या उद्याच्या बैठकीचे त्यांना निमंत्रणच नसल्याचे समोरआले आहे. त्यांनी या बैठकीसाठी वेगळा वेळ मागितल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे.