Gold-Silver Price Crash : दिवाळी आणि धनत्रयोदशीचा सण जवळ आला असताना सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) किमतीत सातत्याने घसरण होतेय. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) पासून ते देशांतर्गत सराफा बाजारापर्यंत मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घट झालीय. गेल्या आठवड्यातील अवघ्या चार दिवसांच्या व्यवहारात चांदीच्या दरात मोठी घसरण झालीय. देशांतर्गत बाजारात चांदी तब्बल 16 हजार रुपयांहून अधिक स्वस्त झाली. तर MCX वर चांदीचा दर उच्चांकापासून सुमारे 2.24 लाख रुपयांनी खाली आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीचा चांदी चार लाखांवर गेली होती. आता ती निम्माहून अधिक स्वस्त झालीय. दुसरीकडे, सोन्याच्या किमतीतही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
दिल्लीसह देशभरात चांदीचे दर कोसळले
दिवाळी आणि धनत्रयोदशीपूर्वीच चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. चांदीचा भाव आता प्रति किलो दोन लाख रुपयांच्या खाली आला आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) वेबसाइटवरील आकडेवारीनुसार 16 ऑक्टोबर रोजी देशांतर्गत बाजारात चांदीचा दर 2 लाख 10 हजार रुपये प्रति किलो होता. मात्र, शुक्रवारी हा दर घसरून 1 लाख 94 हजार रुपये प्रति किलोवर आला. म्हणजेच अवघ्या चार दिवसांत चांदीच्या दरात प्रति किलो 16 हजार 503 रुपयांची घसरण झालीय.
पुण्यातील रिसॉर्टमध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश, 13 तरुणींची सुटका; मुख्य सूत्रधार फरार
MCX वरही चांदीच्या दरात मोठी घसरण
देशांतर्गत सराफा बाजाराप्रमाणेच वायदे बाजारातही चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. 4 डिसेंबर रोजी मुदत संपणाऱ्या चांदीच्या वायदे कराराचा दर 16 ऑक्टोबरला MCX वर 2 लाख 11 हजार 187 रुपये प्रति किलो होता. शुक्रवारी हा दर घसरून 1 लाख 96 हजार 100 रुपये प्रति किलोवर आला. त्यामुळे वायदे बाजारातही चार दिवसांत चांदी प्रति किलो 15,087 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
उच्चांकापासून चांदी 2.24 लाख रुपयांनी स्वस्त
चांदीच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे ग्राहकांना आता ही मौल्यवान धातू विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी किमतीत मिळत आहे. या वर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांदीने 4 लाख 20 हजार रुपये प्रति किलोचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. सध्याच्या दराशी तुलना केल्यास चांदीचा भाव उच्चांकापासून तब्बल 2 लाख 23 हजार रुपयांनी खाली आला आहे.
सोन्याच्या दरात मोठी घसरण
चांदीपाठोपाठ सोन्याच्या किमतीतही या आठवड्यात मोठी घसरण झाली आहे. MCX वरील 4 डिसेंबर रोजी मुदत संपणाऱ्या सोन्याच्या वायदे कराराचा दर 10 ग्रॅमसाठी 1 लाख 47 हजार 918 रुपये होता. त्यात 5 हजार 768 रुपयांची घट होऊन हा दर 1 लाख 42 हजार 150 रुपयांवर आला आहे. दुसरीकडे IBJA च्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 1 लाख 46 हजार 426 रुपयांवरून घसरून 1 लाख 41 हजार 630 रुपयांवर आला आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 4 हजार 796 रुपयांची घट झाली आहे.
