India Imports Sugar : देशात साखरेच्या किमती (Sugar) वाढत आहे. महाराष्ट्रात साखर 60 रुपयांवर गेली आहे. आगामी सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सरकारने 31 ऑक्टोबरपर्यंत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिलीय. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढवून वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांत साखरेच्या किमतीत सुमारे 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जगातील सर्वाधिक साखर वापरणाऱ्या देशांपैकी एक असलेल्या भारताला जवळपास दशकभरानंतर पुन्हा साखर आयात करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
विद्यार्थी आंदोलनातील हिंसाचाराची चौकशी होणार; पाच सदस्यीय समितीची स्थापना, कोणा-कोणाचा समावेश?
दशकभरानंतर पुन्हा साखर आयात
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. त्यामुळे देशांतर्गत गरज भागवण्यासाठी भारत सामान्यतः साखर आयातीवर अवलंबून राहत नाही. उद्योग क्षेत्रातील आकडेवारीनुसार, भारताने यापूर्वी 2017-18 मध्ये मोठ्या प्रमाणात साखर आयात केली होती. आता जवळपास 10 वर्षांनंतर पुन्हा साखर आयातीची वेळ आली आहे. देशांतर्गत उत्पादन आणि पुरवठ्यावर वाढता दबाव असल्याने सरकारने आयातीचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवता यावे, असा सरकारचा प्रयत्न आहे.
सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढणार
ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान देशात साखरेच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी यांसारखे मोठे सण येतात. सणांच्या काळात मिठाई, पेये आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. याशिवाय बिस्किट आणि कन्फेक्शनरी उत्पादक कंपन्यांकडूनही सणासुदीपूर्वी मोठ्या प्रमाणात साखरेचा साठा केला जातो. त्यामुळे बाजारात पुरेसा साखर पुरवठा उपलब्ध राहावा आणि किमतींमध्ये आणखी वाढ होऊ नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
साखरेच्या साठवणुकीच्या मर्यादेतही बदल
साखर आयातीसोबतच सरकारने मोठ्या खरेदीदारांसाठी साठवणुकीचे नियमही कडक केले आहेत. दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या डीलर्सना आता जास्तीत जास्त 15 दिवसांच्या वापराइतकाच साठा ठेवता येणार आहे. हा नवा नियम 1 सप्टेंबरपासून लागू होऊन 30 नोव्हेंबरपर्यंत प्रभावी राहणार आहे. यापूर्वी सरकारने जुलैमध्ये घाऊक खरेदीदारांसाठी 30 दिवसांच्या वापराइतका साखरेचा साठा ठेवण्याची मर्यादा निश्चित केली होती.
कमी पावसामुळे ऊस उत्पादनाची चिंता
साखरेच्या पुरवठ्याबाबत हवामानाची स्थितीही चिंता वाढवत आहे. ऊस हे मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असलेले पीक असून त्याचे उत्पादन पुरेसा पाऊस आणि सिंचनावर अवलंबून असते. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) माहितीनुसार, यंदा मान्सूनचा पाऊस सामान्यापेक्षा सुमारे 13 टक्के कमी झाला आहे. जूनच्या अखेरीस पावसाची तूट 40 टक्क्यांहून अधिक होती. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 14 ऑगस्टपर्यंत देशातील उसाचे क्षेत्रफळ सुमारे 58.3 लाख हेक्टर होते. हे मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत थोडे कमी आहे.
