Why Meta More Trouble In India : भारतातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपनींपैकी एक असलेल्या मेटावर केंद्र सरकारचा दबाव वाढताना दिसत आहे. व्हॉट्सॲपच्या ‘यूजरनेम’ फीचरवर आक्षेप घेतल्यानंतर, आता इन्स्टाग्रामवर मुलांशी संबंधित अश्लील जाहिरातींच्या प्रकरणामुळे कंपनीला स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. एका आठवड्यातील या दोन घटनांमुळे मेटाच्या अडचणी वाढल्या आहेत. नेमकं भारतात मेटा का अडकली? त्याबद्दल जाणून घेऊया…
मेटाकडून सविस्तर उत्तर मागवण्याचे निर्देश
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अधिकाऱ्यांना मेटाकडून या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर उत्तर मागवण्याचे निर्देश दिले आहेत. बीबीसीच्या तपासानंतर ही कारवाई सुरू झाली असून, इन्स्टाग्रामवरील काही पेड जाहिरातींमधून वापरकर्त्यांना टेलिग्राम चॅनेलवर नेले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या चॅनेलवर कथितरीत्या मुलांशी संबंधित अश्लील साहित्य विकले जात असल्याचे समोर आले आहे.
इन्स्टाग्रामच्या जाहिरातींवर सरकारचा आक्षेप
बीबीसीच्या तपासानुसार, भारतात तयार करण्यात आलेल्या नव्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही दिवसांतच अश्लील पोस्ट आणि त्यानंतर मुलांशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर असलेल्या जाहिराती दिसू लागल्या. या जाहिरातींवर क्लिक केल्यानंतर यूजर्सना टेलिग्रामवरील अशा चॅनेलवर पाठवले जात होते, जिथे कथितरीत्या 99 रुपयांत आक्षेपार्ह कंटेंट विकला जात होता. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जाहिरात मेटाच्या रिव्ह्यू आणि मॉडरेशन प्रक्रियेतून जात असताना अशा जाहिराती मंजूर कशा झाल्या? असा प्रश्न केंद्र सरकारने उपस्थित केला आहे. तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कंपनीने कोणती ठोस पावले उचलली आहेत, याचाही खुलासा मागवण्यात येणार आहे.
मेटाचे स्पष्टीकरण काय?
मेटाने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कोणतीही प्रणाली शंभर टक्के अचूक नसल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, संबंधित अनेक जाहिराती हटवण्यात आल्या असून, त्या पोस्ट करणारी अकाउंट्स निलंबित करण्यात आली आहेत. तसेच अनेक यूआरएल ब्लॉक करण्यात आले असून धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या इतर खात्यांवरही कारवाई सुरू आहे.
व्हॉट्सॲपच्या ‘यूजरनेम’ फीचरवरही आक्षेप
इन्स्टाग्राम प्रकरणापूर्वी याच आठवड्यात केंद्र सरकारने व्हॉट्सॲपच्या प्रस्तावित ‘यूजरनेम’ फीचरवरही गंभीर आक्षेप नोंदवला होता. सरकारच्या मते, हे फीचर सुरू झाल्यास ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, डिजिटल अरेस्ट आणि बनावट ओळख वापरण्याचे प्रकार वाढू शकतात. सरकारने मेटाला चर्चा पूर्ण होईपर्यंत हे फीचर लागू न करण्याचे निर्देश दिले असून, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कंपनीविरोधात कारवाई का करू नये, याचेही स्पष्टीकरण मागितले आहे.
भारत मेटासाठी सर्वात मोठी बाजारपेठ
भारत मेटासाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेड्स मिळून देशात एक अब्जाहून अधिक यूजर्स आहेत. केवळ व्हॉट्सॲपचे 60 कोटींपेक्षा अधिक, इन्स्टाग्रामचे 41 कोटींपेक्षा अधिक, तर फेसबुकचेही अनेक कोटी अॅक्टिव्ह यूजर्स भारतात आहेत. यामुळे मेटाशी संबंधित कोणताही निर्णय किंवा सरकारी कारवाई थेट कोट्यवधी भारतीय वापरकर्त्यांवर परिणाम करू शकते.
मेटाला भारताचा थेट संदेश
सुमारे 1.48 ट्रिलियन डॉलर्सचे बाजारमूल्य असलेल्या मेटाने 2025 मध्ये 200 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक महसूल कमावला. जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मेटाकडे प्रचंड आर्थिक ताकद असली, तरी भारतात आता कंपनीच्या कंटेंट मॉडरेशन, वापरकर्त्यांची सुरक्षा आणि नव्या फीचर्सबाबत अधिक कठोर प्रश्न विचारले जात आहेत. त्यात व्हॉट्सॲपच्या यूजरनेम फीचरपासून ते इन्स्टाग्रामवरील कथित आक्षेपार्ह जाहिरातींपर्यंत, एका आठवड्यात घडलेल्या दोन घटनांमुळे भारतीय कायदे आणि वापरकर्त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा थेट संदेशच मेटाला भारत सरकारने दिल्याचे दिसत आहे.
