H3N2 : बदलत्या ऋतूमध्ये भारतातील सर्व भागांमध्ये इन्फ्लूएंझा सारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. हा विषाणू फ्लू किंवा कोविड-19 नाही. पण इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) असलेल्या रुग्णांपैकी निम्मे रुग्ण इन्फ्लूएंझा H3N2 ग्रस्त आहेत. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही पुण्यातील डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी संवाद साधला.
H3N2 विषयी बोलताना डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की मागील काही दिवसापासून या विषाणूचे काही पेशंट सापडत आहेत. हा इंफ्लून्झा व्हायरसचेच म्युटेशन झालेलं आहे. यापूर्वी हा विषाणू पक्षामद्ये, डुक्करांमध्ये आढळून यायचा. त्यांनतर तो माणसामध्ये पसरला. स्वाईनफ्ल्यूशी याचा जवळचा संबंध आहे. १९६८ साली जगभरात याची मोठी साथ आली होती. याचे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे वेगाने प्रसारण होते.
हेही वाचा : सावधान! H3N2 इन्फ्लूएंझा कोरोनासारखाच…, डॉ. गुलेरियांकडून भीती व्यक्त
H3N2 व्हायरसची लक्षणे काय आहेत. यावर बोलताना डॉ. भोंडवे म्हणाले की याची लागण झाल्यावर सर्दी, खोकला, घसा खूप दुखणे, ताप येणे, अंगाची जळजळ होणे अशी याची सुरुवातीची लक्षणे आहेत. पण याची वाढ झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अशक्तपणा येणे. अंग खूप दुखणे, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळून येतात.
डॉ. भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी या विषाणूवर कोणताही उपचार उपलब्ध नाही. त्यामुळे आराम करणे, डॉक्टर सल्ल्यानी याचा उपचार करणे. मास्क वापरणे हेच उपाय आहेत. भारतभरात अनेक पेंशट सापडत आहेत. दिल्ली मध्ये याचे काही पेंशट सापडत आहेत. राज्यात देखील याचे काही रुग्ण आहेत. त्यामुळे काळजी म्हणून शक्यतो गर्दीत जाणे टाळावे, आजारी असेल तर पुरेशी काळजी घेऊन योग्य तो सल्ला घ्यावा.