Heavy clash between TMC and BJP supporters : पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीपूर्वीच तणाव वाढल्याचे चित्र रविवारी (3 मे 2026) बिधाननगर येथे पाहायला मिळाले. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील या मतमोजणी केंद्राबाहेर तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष उफाळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री स्ट्रॉंग रूमजवळ दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. घोषणाबाजी आणि प्रति-घोषणाबाजी यामुळे वातावरण तापले आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्की व संघर्षात झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्यात आले.
स्थानिक पोलिसांनीही तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पांगवले आणि त्यांच्यामध्ये बॅरिकेड्स उभारून वेगळे केले. या घटनेवरून दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. भाजपने आरोप केला की, तृणमूल कार्यकर्त्यांनी त्यांच्या कॅम्पवर पक्षाचे झेंडे लावल्यामुळे वाद पेटला. तर तृणमूल काँग्रेसने दावा केला की केंद्रीय दलांनी त्यांच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. दरम्यान, मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व मतमोजणी केंद्रांभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मतमोजणीच्या दिवशी केंद्राबाहेर फटाके फोडणे आणि विजय मिरवणुका काढण्यास आधीच बंदी घालण्यात आली आहे.
कोंबडी, कुत्रा, शेळीवरही अत्याचार; नरसापूर प्रकरणातील नराधमाचा विकृत इतिहास समोर
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाच्या प्रतिनिधींना विशेष सूचना दिल्या आहेत. ज्या मतदारसंघांमध्ये भाजप 500 ते 700 मतांनी आघाडीवर आहे, तेथे तात्काळ फेरमतमोजणीची मागणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच प्रतिनिधींनी मतमोजणी केंद्राजवळच थांबावे, जेणेकरून ते वेळेवर उपस्थित राहू शकतील, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, काही ठिकाणी हेतुपुरस्सर वीजपुरवठा खंडित करणे, सीसीटीव्ही बंद ठेवणे आणि स्ट्रॉंग रूम परिसरात संशयास्पद हालचाली होत असल्याचे अहवाल मिळत आहेत.
हुगळी जिल्ह्यातील सेरामपूर, नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर, बर्दवान मधील औसग्राम आणि कोलकाता येथील काही केंद्रांचा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन केले की, संपूर्ण रात्र जागून स्ट्रॉंग रूममधील मतांचे संरक्षण करा, संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ तक्रार नोंदवा आणि सीसीटीव्ही फुटेजची मागणी करा. या सर्व घटना भाजपच्या सूचनेवरून घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
