कोंबडी, कुत्रा, शेळीवरही अत्याचार; नरसापूर प्रकरणातील नराधमाचा विकृत इतिहास समोर
महिलांवर नजर वाईट असायची आणि तो प्राण्यांवरही अत्याचार करायचा. त्याला गावातूनही हाकललं होतं.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नरसापूर (Pune) येथील 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि तिची निर्घृण हत्येने सर्वच हादरले. या प्रकरणी 65 वर्षांच्या विकृताला अटक करण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र संतप्त झाला आहे.
या प्रकरणातील नराधमाची विकृती समोर आली आहे. पुतणी आणि एका ज्येष्ठ महिलेवर बलात्कार करणाऱ्या भीमराव कांबळे या नराधमाच्या विकृतीचा थरार आता समोर येत आहे. या नराधमाने केवळ मानवावरच नव्हे, तर कोंबड्या, कुत्रे आणि शेळ्यांसारख्या मुक्या प्राण्यांवरही लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या नराधमाच्या अशाच राक्षसी स्वभावामुळे साळवडे ग्रामपंचायतीने २० वर्षांपूर्वीच ठराव करून त्याला गावातून हाकलून दिले होते.
नराधमाला फाशीची शिक्षा द्या; संतप्त नातेवाइक व ग्रामस्थांनी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखला !
भीमराव कांबळे हा मुळचा नसरापूर शेजारील साळवडे गावचा रहिवासी होता. गावात असतानाही त्याची महिलांवर नजर वाईट असायची आणि तो प्राण्यांवरही अत्याचार करायचा. त्याच्या या सततच्या विकृत कृत्यांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्याला गावातून बाहेर काढले होते. त्यानंतर त्याने आपली गावातील जमीन विकून टाकली आणि तो नसरापूर येथे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या खोलीत राहू लागला होता.
तो पुणे-सातारा महामार्गावरील कामथडी येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. या नराधमाने एका पाच वर्षांच्या बालिकेवर आणि एका वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघड झाल्यानंतर संपूर्ण भोर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या अमानवी घटनेच्या निषेधार्थ रविवारी (दि. ३ मे २०२६) भोर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार आणि प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. औषधांची दुकाने, दूध डेअरी आणि भाजीपाला वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प असल्याने शहरात दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.