Download App

आधी बड्या नेत्यांची पाठ, आता बैठक रद्द करण्याची नामुष्की; काँग्रेसच्या पराभवाने ‘इंडियाला’ घरघर!

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या (6 डिसेंबर) काँग्रेसच्या (Congress) वतीने आयोजित करण्यात आलेली ‘इंडिया’ (India) आघाडी बैठक रद्द करण्यात आली आहे. आता ही बैठक 18 किंवा 19 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी देशभरातील बडे नेते सहभागी होणार होते. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि अन्य बड्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे आता ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. (‘India’ alliance meeting organized by the Congress in connection with the Lok Sabha elections has been cancelled)

मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगत बैठकीला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविली होती.  या बैठकीसाठी जेडीयूतर्फे राष्टीय अध्यक्ष ललन सिंह आणि मंत्री संजय झा उपस्थित राहणार होते. त्यामुळे सोमवारी त्यांच्या उपस्थितीत होणारा जनता दरबारही रद्द करण्यात आला होता. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही बैठकीला जाणार नसल्याचे सांगितले होते.  मध्य प्रदेशच्या निवडणुकीत सपाला काही जागा देण्यास काँग्रेस नेते कमलनाथ यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.  त्यामुळे अखिलेश यादव इंडिया आघाडीवर नाराज आहेत. त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली होती.

INDIA Alliancne : भाजप विजयाचे ‘इंडिया’ला धक्के! उद्याच्या बैठकीकडे नितीशकुमारांची पाठ

ममता बॅनर्जी म्हणल्या, मला बैठकीबद्दल माहितीच नाही!

तर ममता बॅनर्जी यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगत या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. या बैठकीबाबत मला कोणीही सांगितले नाही किंवा मला फोन करूनही या संदर्भात माहिती देण्यात आली नाही. माझा उत्तर बंगालमध्ये 6 ते 7 दिवसांचा कार्यक्रम आहे. मी इतर योजनाही बनविल्या आहेत. आता जर त्यांनी मला बैठकीसाठी बोलावले तर मी माझ्या योजना कशा बदलू शकेन? असे म्हणत त्यांनी बैठकीला नकार दिला होता. त्यापाठोपाठ झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही बैठकीला जाणार नसल्याचे सांगितले होते. याशिवाय तामिळनाडूमधील मिचॉन्ग चक्रीवादळाचा प्रकोप आणि जोरदार पाऊस यामुळे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हेही उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले होते.

मध्य प्रदेशात हायकमांड अ‍ॅक्शन मोडवर, कमलनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी

इंडिया आघाडीची पहिली बैठक 23 जून रोजी पाटना शहरात झाली होती. दुसरी बैठक बंगळुरू येथे झाली होती. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी तिसरी बैठक मुंबईत झाली होती. यानंतर समन्वय समितीच्या बैठका नियमित होत आहेत. आता चौथी मोठी बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पाच राज्यांतील निवडणुकीचा मुद्दाही चर्चेत राहणार होता. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाणा आणि मिझोरम राज्यांतील निवडणुकीत काँग्रेस लढली. मात्र इंडिया आघाडीतील अन्य पक्षांची यात फारशी भूमिका नव्हती.

 

 

Tags

follow us