India Pakistan War : भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पाकिस्तान पूर्णपणे बिथरला आहे. भारताने गुरुवारी पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त करुन टाकले. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्याने काल भारताच्या 15 सैन्य ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या एस 400 ने पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टम उद्धवस्त करुन टाकले.
पाकिस्तानने भारताच्या 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. अनेक ड्रोन्स आणि मिसाइल्सने हल्ला चढवण्यात आला. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हल्ला परतवून लावला. संरक्षण मंत्रालयाने आज दुपारी या घटनेची माहिती दिली. भारताने आधीच बॉर्डरवर रशियाकडून खरेदी केलेल्या अत्याधुनिक एस 400 एअर डिफेन्स सिस्टीमची तैनाती केली आहे. पाकिस्तानने हल्ला करताच एस 400 सिस्टीम तत्काळ कार्यान्वित झाली. त्यानंतर या सिस्टीमने पाकिस्तानच्या मिसाइल्स आणि ड्रोन रस्त्यातच उद्धवस्त केले.
मसूद अजहर भावालाही गमावणार, ऑपरेशन सिंदूरमध्ये कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रऊफ गंभीर जखमी
अवंतीपूरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंडीगढ, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज या शहरांसह उत्तर आणि पश्चिम भारतातील सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता.
एस 400 एक अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम आहे. ही सिस्टीम रशियाच्या एलमाज सेंट्रल डिझाइन ब्यूरोने विकसित केली आहे. या सिस्टीमद्वारे 400 किलोमीटर अंतरावरूनच शत्रूच्या हालचाली टिपता येऊ शकतात. पलटवार करण्यात ही प्रणाली अतिशय तरबेज आहे. मिसाइल, ड्रोन, फायटर जेट्स आणि रॉकेट लाँचर यांच्या मदतीने होणारे हवाई हल्ले रोखण्यात ही यंत्रणा अतिशय अचूक आहे. खरंतर ही एक मोबाइल सिस्टीम आहे. रस्ता मार्गे या यंत्रणेला कुठेही घेऊन जाता येऊ शकते. फक्त पाच ते दहा मिनिटांत या सिस्टिमला ऑपरेशनसाठी तयार केले जाऊ शकते.
एस 400 सिस्टीम 400 किलोमीटरवरील टार्गेट डिटेक्ट करून त्याला नष्ट करू शकते. 92N6E नावाचे रडार यात आहे. या रडारच्या मदतीने 600 किलोमीटर अंतरावरील मल्टिपल टार्गेट्स शोधले जाऊ शकतात. इतकेच नाही तर एकाच वेळी 160 टार्गेट्स ट्रॅक केले जाऊ शकतात. एका टार्गेटवर दोन मिसाइलने हल्ला केला जाऊ शकतो. 30 किलोमीटच्या उंचीवरील टार्गेटलाही या यंत्रणेच्या मदतीने सहज टिपता येते.
भारताने सन 2018 मध्ये रशियाकडून पाच एस 400 युनिट खरेदी करण्याचा करार केला होता. याच सिस्टिममुळे अमेरिकेने तुर्कीवर निर्बंध (India Russia) लादले होते. तसेच भारत आणि रशियाच्या या करारावर आक्षेप घेता होता. परंतु, भारताने अमेरिकेच्या नाराजीचा विचार न करता रशियाकडून एस 400 सिस्टीम खरेदी केलीच.