CAIT On India Wedding Season 2026 : देशात लग्नसराईचा हंगाम सुरू होण्याआधीच बाजारपेठांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. आगामी 25 दिवसांत देशभरात तब्बल 52 लाख लग्नं होण्याचा अंदाज असून, या लग्नांमधून सुमारे 7.50 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, एकट्या दिल्ली-NCR मध्येच 5 लाख लग्नांमधून तब्बल 2.50 लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
Smart Phone Access : मोबाईलमध्ये ‘Allow’ बटण दाबताच सुरू होतो प्रायव्हसीचा खेळ; पण, कसा?कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच CAIT च्या संशोधन विभागाने हा अंदाज तयार केला आहे. यासाठी देशातील 25 राज्यांमधील प्रमुख बाजारपेठांमधील 300 हून अधिक व्यापारी आणि 550 व्यापारी संघटनांशी चर्चा करून सर्वेक्षण करण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी विवाह हंगाम केवळ वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर देशातील व्यापारी, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रासाठीही मोठी संधी घेऊन येणार आहे. शिवाय 1.25 कोटी रोजगाराच्या संधीदेकील उपलब्ध होणार आहेत.
21 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरदरम्यान 52 लाख लग्नांचा अंदाज
CAIT च्या अंदाजानुसार, 21 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2026 या 25 दिवसांच्या कालावधीत देशभरात सुमारे 52 लाख विवाह सोहळे पार पडण्याची शक्यता आहे. या काळात लग्नांशी संबंधित विविध वस्तू आणि सेवांवर मिळून तब्बल 7.50 लाख कोटी रुपये खर्च होऊ शकतात.
सोनं, दागिने आणि कपड्यांच्या खरेदीवर सर्वाधिक खर्च
या लग्नसराईत सर्वाधिक फायदा दागिने आणि कपड्यांच्या व्यवसायाला होण्याची शक्यता आहे. CAIT च्या अंदाजानुसार, एकूण 7.50 लाख कोटी रुपयांच्या उलाढालीपैकी 4.05 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय वस्तू आणि किरकोळ खरेदीतून होऊ शकतो. तर उर्वरित 3.45 लाख कोटी रुपयांची उलाढाल सेवा क्षेत्रातून अपेक्षित आहे. CAIT On India Wedding Season
वस्तूंच्या खरेदीमध्ये सर्वाधिक वाटा दागिने आणि मौल्यवान धातूंचा असणार आहे. या क्षेत्रात सुमारे 1.20 लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर साड्या, कपडे आणि इतर परिधानांच्या खरेदीतून 90 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होऊ शकतो. याशिवाय भेटवस्तू आणि लग्नाशी संबंधित साहित्यावर 37,500 कोटी रुपये, किराणा आणि खाद्यपदार्थांवर 37,500 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. यादरम्यान इलेक्ट्रॉनिक्स, मिठाई, सुका मेवा, फर्निचर आणि घरगुती वस्तूंच्या विक्रीलाही मोठी चालना मिळू शकते.
Kolhapur News : कोल्हापूरकरांचा नाद खुळा म्हणायचा नाय तर, काय म्हणायचं?
हॉटेल, केटरिंग आणि डेकोरेशन व्यवसायाचीही चांदी
लग्नसराईचा फायदा केवळ सोनं आणि कपड्यांच्या बाजारपेठेलाच होणार नाही, तर सेवा क्षेत्रातही मोठी आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. CAIT च्या अंदाजानुसार, केटरिंग आणि खानपान सेवांमधून सुमारे 75 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होऊ शकतो. तर विवाहस्थळं, बँक्वेट हॉल आणि हॉटेल्समधून 60 हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
याशिवाय इव्हेंट मॅनेजमेंट आणि वेडिंग प्लॅनिंगवर 37,500 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. तर, फुलांची सजावट आणि वेडिंग डेकोरेशनसाठीही 37,500 कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, डीजे, संगीत, प्रवास, वाहतूक, ब्युटी आणि ग्रूमिंग यांसारख्या व्यवसायांनाही या हंगामाचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे.
एकट्या दिल्ली-NCR मध्ये 2.50 लाख कोटींचा व्यवसाय
या संपूर्ण विवाह हंगामात दिल्ली-NCR हे सर्वात महत्त्वाचं व्यावसायिक केंद्र ठरण्याची शक्यता आहे. या भागात सुमारे 5 लाख लग्नं होण्याचा अंदाज असून, त्यातून तब्बल 2.50 लाख कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते. दिल्लीतील चांदणी चौक, खारी बावली, सदर बाजार, करोल बाग, लाजपत नगर, गांधी नगर, कमला नगर, कनॉट प्लेस, खान मार्केट, ग्रेटर कैलाश, प्रीत विहार आणि शाहदरा या प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, दिल्लीच्या घाऊक बाजारपेठांमध्ये केवळ दिल्लीतीलच नव्हे, तर आसपासच्या राज्यांमधील व्यापारी आणि किरकोळ विक्रेतेही खरेदीसाठी येतात. त्यामुळे या लग्नसराईचा फायदा दिल्लीसह आसपासच्या बाजारपेठांनाही होऊ शकतो.
लग्नसराईत 1.25 कोटी रोजगाराच्या संधी
या विवाह हंगामाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे रोजगारनिर्मिती. CAIT च्या अंदाजानुसार, या लग्नसराईत देशभरात सुमारे 1.25 कोटी तात्पुरत्या, हंगामी आणि अर्धवेळ रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. याचा फायदा टेंट व्यावसायिक, फुलविक्रेते, डेकोरेटर्स, केटरर्स, फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स, ब्युटीशियन्स, वाहनचालक, हॉटेल कर्मचारी, इव्हेंट मॅनेजर्स आणि तांत्रिक कामगारांना होणार आहे. याशिवाय स्थानिक कारागीर, छोटे दुकानदार आणि घरगुती उद्योगांनाही उत्पन्न मिळण्याची संधी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आला आहे.
पाच वर्षांत उलाढाल दुपटीच्या जवळ…
भारतातील विवाह बाजारपेठेचा विस्तार गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने होत असल्याचं CAIT च्या आकडेवारीवरून दिसतं. गेल्या काही वर्षांतील विवाह आणि अंदाजित उलाढालीची आकडेवारी पाहिली तर ही वाढ स्पष्ट होते.
| वर्ष | लग्नांची संख्या | अंदाजित उलाढाल |
|---|---|---|
|
2022 |
32 लाख |
3.75 लाख कोटी |
|
2023 |
38 लाख |
4.74 लाख कोटी |
|
2024 |
48 लाख |
5.90 लाख कोटी |
|
2025 |
46 लाख |
6.50 लाख कोटी |
|
2026 |
52 लाख |
7.50 लाख कोटी |
या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये 3.75 लाख कोटी रुपयांची असलेली विवाह बाजारपेठ 2026 मध्ये 7.50 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. म्हणजेच पाच वर्षांत या बाजारपेठेची अंदाजित उलाढाल दुप्पट झाली आहे.
CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया यांच्या मते, भारतीय विवाह बाजारपेठेची ही क्षमता देशांतर्गत बाजारपेठेचा विस्तार आणि ग्राहकांचा वाढता आर्थिक विश्वास दर्शवते. तर राष्ट्रीय चेअरमन बृजमोहन अग्रवाल यांनी प्रत्येक लग्नातून व्यापार आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, CAIT ने लग्नाच्या खरेदीसाठी भारतीय उत्पादने आणि स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्याचं आवाहन कुटुंबांना केलं आहे. स्वदेशी कपडे, दागिने, हस्तकला, घरगुती वस्तू आणि लग्नातील भेटवस्तूंची खरेदी केल्यास स्थानिक व्यापारी, कारागीर आणि देशांतर्गत उद्योगांना बळ मिळू शकतं.
एकूणच, आगामी 25 दिवसांची लग्नसराई देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी आर्थिक संधी ठरण्याची शक्यता आहे. शहनाईच्या सुरांसोबतच बाजारपेठांमध्येही कोट्यवधींची उलाढाल होणार असून, त्याचा फायदा किरकोळ व्यापारापासून ते हॉटेल, पर्यटन आणि सेवा क्षेत्रापर्यंत अनेक व्यवसायांना मिळू शकतो.
