जगात दिवाळ पण, भारतात दिवाळी; ग्‍लोबल मार्केटमधील पडझडीचा भारतीय बाजारात परिणाम का नाही?

Indian Share Market Indian Share Market जागतिक शेअर बाजारांमध्ये पडझडीचे वादळ घोंघावत असताना भारतीय शेअर बाजाराने मात्र आपल्या ताकदीची झलक दाखवून दिली आहे.

Share Market

Share Market

जागतिक शेअर बाजारांमध्ये पडझडीचे वादळ घोंघावत असताना भारतीय शेअर बाजाराने मात्र आपल्या ताकदीची झलक दाखवून दिली आहे. अमेरिका आणि आशियातील प्रमुख बाजारांमध्ये मोठी घसरण होत असताना भारतीय बाजाराने सुरुवातीच्या धक्क्यातून जोरदार कमबॅक केला. सेन्सेक्सने तब्बल 600 अंकांची झेप घेतली, तर निफ्टीनेही पुन्हा तेजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. विशेष म्हणजे, अमेरिकेतील टेक शेअर्सची मोठी घसरण आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता यांच्यामध्येही भारतीय IT शेअर्समध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. परदेशी गुंतवणूकदारांची वाढती खरेदी आणि मजबूत देशांतर्गत संकेतांमुळे भारतीय बाजाराने जागतिक मंदीच्या वातावरणातही आशेचा किरण दाखवला आहे. त्यामुळे भारतात दिवाळी आणि जगात दिवाळं निघालेलं असताना ग्‍लोबल मार्केटमधील पडझडीचा भारतीय बाजारात का नाही पडला? याबद्दल जाणून घेऊया…

अमेरिका आणि आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण सुरू असताना भारतीय शेअर बाजाराने मात्र उल्लेखनीय लवचिकता दाखवली आहे. जागतिक बाजारांमध्ये AI आणि टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असताना भारतीय बाजाराने सुरुवातीच्या घसरणीतून सावरत पुन्हा तेजीच्या दिशेने वाटचाल केली. त्यामुळे जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची ताकद अधोरेखित झाली आहे.

सेन्सेक्स-निफ्टीची दमदार रिकव्हरी

शुक्रवारी सकाळी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. सुरुवातीला सेन्सेक्स जवळपास 300 अंकांनी घसरून 79,016 च्या पातळीवर आला, तर निफ्टी 148 अंकांनी घसरून 24,388 वर पोहोचला. मात्र, खरेदीदारांनी बाजारात जोरदार पुनरागमन केले. सकाळी 9.45 वाजेपर्यंत सेन्सेक्स सुमारे 600 अंकांनी वधारून 79,868 वर, तर निफ्टी जवळपास 100 अंकांनी वाढून 24,641 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

IT शेअर्समध्ये तेजी; गुंतवणूकदारांना दिलासा

विशेष म्हणजे, अमेरिकेतील टेक शेअर्समध्ये मोठी घसरण होत असतानाच भारतीय IT क्षेत्राने सकारात्मक कामगिरी केली. निफ्टी IT निर्देशांकात जवळपास 2 टक्क्यांची वाढ झाली. इन्फोसिस, TCS, HCL टेक आणि टेक महिंद्रा यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. याशिवाय खासगी बँका आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्समध्येही खरेदीचा उत्साह होता.

FII ची मोठी खरेदी भारतीय बाजारासाठी ठरली आधार

भारतीय बाजाराला परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) मोठा आधार मिळत आहे. गेल्या पाच सलग व्यवहार सत्रांमध्ये FII ने तब्बल 35,781 कोटी रुपयांची शेअर खरेदी केली आहे. गुरुवारी एकाच दिवसात त्यांनी 14,974 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. परदेशी गुंतवणूकदारांचा हा वाढता विश्वास बाजारातील तेजीला बळ देणारा ठरत आहे.

जागतिक बाजारात मात्र मोठी घसरण

दुसरीकडे, अमेरिकेतील Nasdaq निर्देशांकात 5.52 टक्क्यांची मोठी घसरण झाली. AI आणि सेमीकंडक्टर कंपन्यांच्या शेअर्समधील विक्रीमुळे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रावर दबाव निर्माण झाला. आशियात जपानचा निक्केई 225 जवळपास 6 टक्के, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी जवळपास 9 टक्क्यांनी घसरला. कोस्पीमधील तीव्र घसरणीमुळे तेथील व्यवहार तात्पुरते थांबवावे लागले.

भारतीय बाजारासाठी पुढील दिशा काय?

जागतिक बाजारातील अस्थिरता, कच्च्या तेलाच्या किमती, परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी आणि कंपन्यांचे तिमाही निकाल हे भारतीय बाजारासाठी महत्त्वाचे घटक ठरणार आहेत. सध्या भारतीय बाजाराने जागतिक दबावाला दिलेले प्रत्युत्तर सकारात्मक असले, तरी ही तेजी कायम राहील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगून बाजारातील पुढील संकेतांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. एकूणच, जगभरातील बाजारांमध्ये विक्रीचा दबाव असताना भारतीय शेअर बाजाराने दाखवलेली रिकव्हरी ही देशांतर्गत गुंतवणूकदारांचा विश्वास आणि बाजाराची तुलनात्मक ताकद अधोरेखित करणारी ठरली आहे.

Exit mobile version