दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IndiGo) धावपट्टी क्रमांक २८ वर आज शनिवार (दि. 28 मार्च) रोजी सकाळी अधिकाऱ्यांनी संपूर्ण आणीबाणी जाहीर केल्याने गोंधळ उडाला. इंडिगोच्या विमानाचे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही आणीबाणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असावी, असा संशय आहे. आणीबाणी जाहीर झाल्यानंतर थोड्याच वेळात, विमानाने विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग केलं आणि एक मोठी दुर्घटना टळली.
आज सकाळी विशाखापट्टणमहून येणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे कळताच दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. इंजिन निकामी होण्याची शक्यता असल्याने रनवे २८ वर ‘पूर्ण आपत्कालीन’ स्थिती जाहीर करण्यात आली. तथापि, वैमानिकाची प्रसंगावधानता आणि विमानतळ प्रशासनाच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.
आपत्कालीन नियमांचे पालन करून, इंडिगो विमानाने शनिवारी (28 मार्च) सकाळी १०:५४ वाजता आयजीआय विमानतळावरील रनवे २८ वर सुरक्षितपणे लँडिंग केले. कोणतीही अनुचित घटना हाताळण्यासाठी रनवेवर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात एकूण १६१ प्रवासी होते. विमान उतरल्यानंतर लगेचच सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यांची तपासणी झाल्यावर त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी सोडण्यात आले.
इंडिगो प्रशासन आता या इंजिनमधील बिघाडाच्या कारणांची सखोल चौकशी करत आहे. अहवालानुसार, जानेवारी २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान एकूण ७५४ विमानांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ३७७ विमानांमध्ये सतत तांत्रिक दोष असल्याचे आढळून आले. संसदीय स्थायी समितीच्या ताज्या तपासणी अहवालातील आकडेवारीवरून असे सूचित होते की, आजचे आपत्कालीन लँडिंग हा केवळ एक योगायोग नसून, एका मोठ्या संकटाचा भाग असू शकतो.
