History Of Crude Oil When First Time Crude Oil Used In Car : सध्या जगभरात एकाच गोष्टीची चर्चा आहे—ती म्हणजे कच्चं तेल (Crude Oil). रशिया-युक्रेन असो वा इस्रायल-इराण-अमेरिकेचं युद्ध, या संघर्षाचा थेट फटका आपल्या खिशाला बसतोय, कारण कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. पण हे ‘काळे सोनं’ नेमकं आलं कुठून? याचा शोध कोणी लावला? आणि ५००० वर्षांपूर्वी याचा वापर कशासाठी व्हायचा? चला, जाणून घेऊया कच्च्या तेलाचा रंजक इतिहास!”
कच्चं तेल म्हणजे नक्की काय?
“कच्चं तेल हे एक नैसर्गिक, काळ्या रंगाचं आणि चिकट खनिज तेल आहे. याला ‘जीवाश्म इंधन’ (Fossil Fuel) म्हणतात. याचा इतिहास डायनासोरपेक्षाही जुना आहे! लाखो वर्षांपूर्वी समुद्रातील प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष जमिनीखाली गाडले गेले. प्रचंड उष्णता आणि दाबामुळे (Heat and Pressure) या अवशेषांचे रूपांतर कच्च्या तेलात झाले. हे तेल जमिनीतून किंवा समुद्राच्या तळाशी ड्रिलिंग करून काढले जाते आणि नंतर रिफायनरीमध्ये त्यावर प्रक्रिया करून पेट्रोल, डिझेल आणि केरोसीन बनवले जाते.”
५००० वर्षांपूर्वीचा वापर : ममी आणि ताबूत
“तुम्हाला वाटेल की, कच्च्या तेलाचा शोध अलीकडचा आहे, पण तसे नाही! सुमारे ५००० वर्षांपूर्वी प्राचीन मिस्रमध्ये (Egypt) याचा वापर व्हायचा. पण इंधन म्हणून नाही, तर चक्क ‘ममी’ सुरक्षित ठेवण्यासाठी! ब्रिटीश म्युझियमच्या मते, ममीच्या ताबूतावर एक काळा चिकट लेप लावला जायचा. हा लेप म्हणजे वनस्पती तेल, मेण आणि ‘बिटुमेन’ (कच्च्या तेलाचा एक प्रकार) यांचे मिश्रण असल्याचे संशोधनात आढळलं.
१८५९ साली झाली खरी क्रांती
“आधुनिक जगात कच्च्या तेलाची खरी क्रांती १८५९ मध्ये झाली. २७ ऑगस्ट १८५९ रोजी अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ‘टायटसविले’ शहरात जॉर्ज बिसेल आणि एडविन एल. ड्रेक यांनी ७० फूट खोल खोदकाम केले. एका साध्या ड्रिलिंग मशिनच्या साहाय्याने त्यांनी जगातील पहिल्या व्यावसायिक तेल विहिरीचा शोध लावला. तिथूनच जगाला समजलं की, जमिनीच्या खाली तेलाचा अथांग खजिना दडलेला आहे!”
कारमध्ये तेलाचा वापर सर्वात आधी कधी झाला?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कारमध्ये तेलाचा वापर सर्वात आधी कधी झाला? तर, कच्च्या तेलापासून पेट्रोल आणि डिझेल तयार करण्यात आले. याच्या मदतीने बाईक, कार आणि मोठी वाहने धावू लागली. १८८५ मध्ये जर्मन इंजिनिअर कार्ल बेंझ यांनी मोटर कारचा शोध लावला आणि त्यावेळी त्यांनी कार चालवण्यासाठी गॅसोलीनचा वापर केला. रॉकेल (केरोसिन) तयार करताना मिळणाऱ्या ‘बाय-प्रॉडक्ट’ला (उपोत्पादन) गॅसोलीन म्हटले जायचे. १९०८ मध्ये हेन्री फोर्ड यांच्या ‘मॉडल टी’ कारला चालवण्यासाठी गॅसोलीनचा वापर करण्यात आला. त्यानंतर खऱ्या अर्थाने पेट्रोलला ओळख मिळाली आणि त्याची मागणी सतत वाढत गेली.
आज कच्चं तेल केवळ इंधन राहिलेले नाही, तर ते जागतिक राजकारणाचे शस्त्र बनले आहे. अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे तेलाच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम झाल्याने जगाच्या अर्थव्यवस्थेची चाकं डळमळीत झालं असून, या ‘काळ्या सोन्यावर’ जगाचं नियंत्रण मिळवण्याची जोरदार चढाओढ सुरू आहे. तर, हा होता कच्च्या तेलाचा प्रवास. ममीच्या लेपापासून ते तुमच्या कारच्या टाकीपर्यंतचा!
