तुमची गँगस्टरने हत्या केली, तर कुटुंबाला विम्याचे पैसे मिळतील का?; आयोगाचा निकाल अन् नियम काय?

Insurance Claim हत्या म्हणजे गुन्हा, मग अशा प्रकरणात अपघाती मृत्यूचा अतिरिक्त विमा लाभ कसा मिळणार? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. पण...

Is murder by gangsters an accidental death for insurance claims?

Is murder by gangsters an accidental death for insurance claims?

Consumer Commission On Murder By Gangster & Insurance Claim : समजा, एखाद्या व्यक्तीची गँगस्टरने सुपारी देऊन हत्या केली, तर त्याच्या कुटुंबाला विम्याचे पैसे मिळतील का? हत्याच झाली आहे, मग अपघाती मृत्यूचा विमा कसा मिळणार, असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो. पण हत्या आधीच नियोजन करून घडवून आणली असेल, तरी कुटुंबाला अपघाती मृत्यूचा अतिरिक्त विमा लाभ मिळू शकतो. पंजाब राज्य ग्राहक आयोगाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयातून ही बाब समोर आली आहे. एका हत्या प्रकरणात भारतीय जीवन विमा महामंडळाला म्हणजेच LIC ला मृताच्या कुटुंबाला चार विमा पॉलिसींच्या आधारे अतिरिक्त लाभ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एवढंच नाही, तर या रकमेवर 30 एप्रिल 2021 पासून वार्षिक 6 टक्के व्याजही द्यावं लागणार आहे. पण नेमकं हे प्रकरण काय आहे आणि हत्या झाली तरी विम्याचे पैसे कसे मिळू शकतात? त्याबद्दल समजून घेऊया….

इस्रायलमध्ये सत्तेसाठी ‘महाराष्ट्र पॅटर्न’ सारखं राजकीय गणित?, नेतान्याहूंसमोर 8 पर्याय; किंगमेकर कोण?

नेमकं प्रकरण काय?

ही घटना पंजाबमधील मोगा येथील आहे. 14 जुलै 2020 रोजी तजिंदर सिंह हे त्यांच्या दुकानात बसले होते. त्यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली. तजिंदर सिंह यांनी LIC च्या चार विमा पॉलिसी घेतल्या होत्या. या पॉलिसींमध्ये अपघाती मृत्यू झाल्यास मूळ विमा रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे देण्याची तरतूद होती. चारही पॉलिसींची मिळून मूळ विमा रक्कम 26.6 लाख रुपये होती.तजिंदर सिंह यांच्या मृत्यूनंतर LIC ने त्यांच्या कुटुंबाला सामान्य मृत्यूचा विमा लाभ दिला. मात्र, अपघाती मृत्यूचा अतिरिक्त लाभ देण्यास नकार दिला. कंपनीचं म्हणणं होतं की, गँगस्टर सुखप्रीत सिंह ऊर्फ सुखा गिल लाम्मे याने परिसरात दहशत पसरवण्यासाठी ही हत्या घडवून आणली होती. त्यामुळे ही नियोजनपूर्वक केलेली हत्या आहे आणि अशा प्रकरणात अतिरिक्त अपघाती विमा लाभ देता येणार नाही. मोगा जिल्हा ग्राहक आयोगाने नोव्हेंबर 2022 मध्ये एलआयसीचा युक्तिवाद स्वीकारला आणि कुटुंबाची तक्रार फेटाळून लावली. त्यानंतर कुटुंबाने राज्य ग्राहक आयोगाकडे धाव घेतली.

LIC चा दावा आयोगाने का फेटाळला?

LIC ने गँगस्टरच्या कथित सोशल मीडिया पोस्टचा आधार घेत तजिंदर सिंह यांचा काही वाद असल्याचा दावा केला होता. मात्र, या दाव्याला पोलिसांच्या तपासातून किंवा FIR मधून ठोस आधार मिळत नसल्याचं आयोगाच्या निदर्शनास आलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तजिंदर सिंह स्वतः अशा कोणत्या कृतीत सहभागी होते, ज्यामुळे त्यांची हत्या झाली, हे LIC ला सिद्ध करता आलं नाही. आयोगाने LIC च्या 2007 मधील एका परिपत्रकाचाही संदर्भ दिला. त्यानुसार, मृत व्यक्तीने हत्येला चिथावणी दिल्याचा किंवा विम्याचा दावा करणाऱ्या कुटुंबाचा या हत्येत सहभाग असल्याचा पुरावा नसेल, तर केवळ हत्या झाली म्हणून अतिरिक्त विमा लाभ रोखणे योग्य ठरत नाही. शिवाय, तजिंदर सिंह यांच्या मृत्यूच्या प्रकरणात अतिरिक्त विमा लाभ नाकारण्यासाठी पॉलिसीतील नेमकी कोणती अट लागू होते, हेही LIC दाखवू शकली नाही. त्यामुळे कंपनीने नियमांचा अतितांत्रिक आधार घेतल्याचं आयोगाने म्हटलं.

सोशल मीडियावर Like केल्यावर मिळणार पैशांचा पर्याय; एलन मस्कचा भन्नाट प्लॅन…

कुटुंबाला आता किती पैसे मिळणार?

राज्य ग्राहक आयोगाने जिल्हा आयोगाचा आधीचा निर्णय रद्द केला असून, LIC ला तजिंदर सिंह यांच्या चारही पॉलिसींच्या आधारे अतिरिक्त अपघाती मृत्यू लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चार पॉलिसी मिळून मूळ विमा रक्कम २६.६ लाख रुपये. अपघाती मृत्यूसाठी पॉलिसीमध्ये ठरवलेली अतिरिक्त रक्कम आणि त्यावर 30 एप्रिल 2021 पासून वार्षिक 6 टक्के दराने व्याज देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अतिरिक्त विमा लाभ आणि व्याज मिळून एकूण किती रक्कम कुटुंबाला मिळणार हे याबाबत कोणतीही आकडेवारी समोर आलेली नाही.

आयोगाच्या निर्णयाचा इतर विमाधारकांना काय फायदा?

पंजाब राज्य ग्राहक आयोगाच्या या निर्णयानंतर विमा कंपन्यांकडून अपघाती मृत्यूच्या दाव्यांची छाननी कशी केली जावी, याबाबत महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. तसेच एखाद्या व्यक्तीची गँगस्टरने हत्या केली, तर त्याच्या कुटुंबाला अपघाती मृत्यूचा अतिरिक्त विमा लाभ मिळू शकतो का? याचं उत्तर प्रत्येक प्रकरणात वेगळं असू शकतं. कारण, हत्या जाणूनबुजून करण्यात आली असली, तरी त्यामुळे विम्याचा अतिरिक्त लाभ आपोआप नाकारता येत नाही. संबंधित पॉलिसीमध्ये काय अटी आहेत, पोलिसांच्या तपासातून काय समोर आलं आहे आणि मृत व्यक्तीचा या घटनेशी काही संबंध होता का, याचा विचार करणं आवश्यक आहे. मात्र, याचा अर्थ हत्या झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला अतिरिक्त विमा रक्कम मिळेलच, असा नाही. त्यासाठी पॉलिसीच्या अटी आणि प्रकरणातील पुरावे महत्त्वाच्या ठरू शकतात.

पण, पंजाब राज्य ग्राहक आयोगाच्या या निर्णयातून एक महत्त्वाची बाब स्पष्ट झाली आहे. ती म्हणजे हल्लेखोराने जाणीवपूर्वक हत्या केली, ही गोष्ट आणि विमा पॉलिसीनुसार त्या मृत्यूला अतिरिक्त लाभ मिळू शकतो का, हे दोन वेगळे मुद्दे आहेत. त्यामुळे विमा कंपनीने दावा नाकारताना केवळ हत्येचं कारण पुढे करून चालणार नाही, तर पॉलिसीतील नेमकी कोणती अट लागू होते आणि त्यासाठी कोणते पुरावे आहेत, हेही स्पष्ट करावं लागेल.

Exit mobile version