Download App

Chandrayaan-3 : इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीच्या चरणी; प्रतिकृती मॉडेलसह मिशन यशस्वीतेसाठी प्रार्थना

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोसाठी शुक्रवार (14 जुलै) हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे. या दिवशी इस्त्रो आपले महत्त्वाकांक्षी चांद्रयान मिशन-3 लाँच करणार आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान 3 दुपारी 2.35 वाजता चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. ते 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे अपेक्षित आहे. आतापर्यंत जगातील कोणत्याही देशाने ही कामगिरी केलेली नाही.

दरम्यान, या मोहिमेपूर्वी इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ आणि शास्त्रज्ञांच्या चमूने आज (13 जुलै) रॉकेटच्या लघु मॉडेलसह आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील श्री चेंगलम्मा मंदिरात प्रार्थना केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “चांद्रयान-3 उद्यापासून आपला प्रवास सुरू करेल. आम्हाला आशा आहे की सर्व काही ठीक होईल आणि ते 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल”. (ISRO Chairman S Somanath along with a team of scientists on Thursday offered prayers at Sri Chengalamma Temple in Tirupati)

‘चंद्रयान-3’ मोहीम काय आहे?

अंतराळ क्षेत्रात प्रगती करण्यासाठी भारताने आजवर विविध मोहिमा आखल्या आहेत. 2008 साली चंद्रयान-1 यशस्वी झाल्यानंतर भारताने दुसरी चंद्रयान मोहीम आखली होती. तब्बल 10 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर 2019 मध्ये भारताची चांद्रयान -2 ची तयारी पूर्ण झाली. चांद्रयान अवकाशाकडे झेपावले देखील. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे शेवटच्या क्षणी ही मोहीम अयशस्वी झाली. 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-2 मोहीम 4 सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अंशत: अयशस्वी झाली होती.

यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नियोजित चंद्रयान-3 मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली. मागील 4 वर्षांच्या काळातील प्रयत्नांनंतर चांद्रयान 3 ची तयारी पूर्ण झाली असून 14 जुलैदरम्यान ही अंतराळ मोहीम प्रक्षेपित होणार आहे. तर चंद्रावर अंतराळ यान उतरवण्याचा भारताचा दुसरा प्रयत्न असणार आहे.  दरम्यान,  या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे 42 दिवस लागण्याची शक्यता आहे, 23 ऑगस्ट रोजी पहाटे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग होणार आहे.

चंद्रयान-1 च्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात आला होता. यावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा शोध लावला होता. या शोधासाठी अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने भारताची पाठ थोपटली होती. यानंतर ‘चंद्रयान-2 मिशन अयशस्वी झाले होते. आत चंद्रयान-3 प्रत्यक्ष चंद्रावर उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करणार आहे.

Tags

follow us