विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर झारखंड सरकार झुकले ! JSSC-CGL परीक्षा रद्द; हेमंत सोरेन यांची घोषणा

Hemant Soren: मुख्यमंत्र्यांनी 2014 पासून घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.

Hemant Soren

Hemant Soren

Jharkhand govt to cancel JSSC-CGL examination: काही परिक्षा रद्द करण्यासाठी झारखंडमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनासमोर अखेर झारखंड (Jharkhand) सरकार झुकले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मागण्या मान्य करत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी सोमवारी JSSC-CGL ( Jharkhand Staff Selection Commission Combined Graduate Level ) परीक्षा रद्द करण्याची घोषणा केलीय. तसेच 2014 पासून घेण्यात आलेल्या भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेची सर्वसमावेशक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री सोरेन म्हणाले, “या प्रकरणाच्या सर्व बाबींचा विचार करून TDPL शी संबंधित सर्व काही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षा, जाहीर झालेले निकाल, निवड झालेले किंवा परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार तसेच TDPL कडून करण्यात आलेल्या इतर सर्व कामांचा समावेश आहे. केंद्र सरकारने जुलैमध्ये संसदेत मंजूर केलेले Public Examinations (Prevention of Unfair Means) Amendment Bill, 2026 झारखंडमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. या सुधारित कायद्यानुसार संघटित कॉपी, परीक्षेतील गैरप्रकार आणि फसवणुकीसाठी कठोर शिक्षेची तरदूत करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी 2014 पासून घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.झारखंडमध्ये नोकरीच्या इच्छुक उमेदवारांचे गेल्या 24 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. विविध भरती परीक्षांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत आंदोलक विद्यार्थ्यांकडून कारवाईची मागणी करण्यात येत होती.

2024 मधील JSSC-CGL परीक्षेवर प्रश्नचिन्ह
आंदोलक विद्यार्थ्यांची विशेष मागणी सप्टेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेली JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याची होती. या परीक्षेचा प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 135 पैकी 120 प्रश्न लीक झाले होते, असा दावा आंदोलकांनी केला आहे. याशिवाय झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (JSSC) यांच्या कामकाजात व्यापक सुधारणा करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. कथित गैरप्रकारांची CBI चौकशी करण्याची मागणीदेखील आंदोलनकर्त्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थी नेत्यांनी दिला होता.

Exit mobile version