Jio IPO fully subscribed in just 35 minutes should you invest What GMP, potential listing gains, experts say : जिओ (Jio) प्लॅटफॉर्म्सचा बहुप्रतीक्षित आयपीओ (IPO) आज, 21 ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. मात्र ट्रेडींग सुरू होताच अवघ्या 35 मिनिटांमध्येच हा आयपीओ संपला आहे. मात्र हा आयपीओ खरेदी करावा की, नाही याबाबत जीएमपी, लिस्टिंग गेन आणि तज्ज्ञांची मतं काय? जाणून घ्या सविस्तर…
Jio IPO चा जीएमपी काय आहे?
कोणत्याही IPO ची लिस्टींग कशी असू शकते याचा मिळता जुळता अंदाज ग्रे मार्केट प्रीमियममधून येऊ शकतो. यात जीओच्या आयपीओबद्दल सांगण्यात आलं आहे की, हा आयपीओ दिवसेंदिवस तेजीत आहे. बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास 273 रूपयांवर होता. जो 12 तास अगोदर 259 रूपयांवर होता.
लिस्टिंग गेन मिळण्याची किती शक्यता?
वाढत्या ग्रे मार्केट प्रीमियमच्या (GMP) आधारे जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात सुमारे 1375 रुपयांच्या दराने सूचीबद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदाराला जिओच्या आयपीओचा एक लॉट मिळेल, त्याला सुमारे 3 हजार रुपयांचा लिस्टिंग गेन मिळू शकतो. एका लॉटमध्ये 12 शेअर्स असून, प्रत्येक शेअरमागे सुमारे 250 रुपयांचा प्रीमियम मिळण्याचा अंदाज आहे. रिलायन्सच्या भागधारकांना हे शेअर्स 54 रुपयांनी स्वस्त मिळत असल्याने त्यांच्यासाठी संभाव्य लिस्टिंग गेन अधिक असू शकतो.
एंजल गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी
किरकोळ गुंतवणूकदारांपूर्वीच एंजल गुंतवणूकदारांनी जिओच्या आयपीओमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. त्यामुळे एंजल गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या कोट्याला 30 पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. या कोट्यात 8109.84 कोटी रुपयांचे शेअर्स उपलब्ध असून, त्यासाठी 2.5 लाख कोटी रुपयांपर्यंतची मागणी नोंदवण्यात आली आहे. जिओच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रमुख संस्थांमध्ये ब्लॅकरॉक, कॅपिटल ग्रुप, फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्स, टी. रो प्राइस, जेपी मॉर्गन ॲसेट मॅनेजमेंट, फ्रँकलिन टेम्पल्टन, इन्व्हेस्को आणि जॅनस हेंडरसन यांसारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बार कौन्सिलच्या सदस्यांचा सन्मान
जिओच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 13248 रुपये गुंतवावे लागतील. प्रति शेअर 1104 रुपये या दराने 12 शेअर्सच्या एका लॉटची किंमत इतकी होते. हा आयपीओ 21 ऑक्टोबर रोजी खुला झाला असून 23 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे. त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजारावर (NSE) शेअर्सचे लिस्टिंग होणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
जिओचा आयपीओ खरेदी करावा का?
मोतीलाल ओसवाल, कॅनरा बँक सिक्युरिटीज आणि आनंद राठी यांच्यासह अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी जिओच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केल्याचे सांगण्यात आले आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या मते, लिस्टिंग गेन मिळवण्याच्या दृष्टीने तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीही हा आयपीओ विचारात घेण्यासारखा आहे. एमके ग्लोबलनेही बाजारातील नेतृत्व, किंमत ठरवण्याची क्षमता आणि डिजिटल सेवांच्या विस्ताराच्या शक्यतांचा विचार करता या आयपीओकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले आहे.
कॅनरा बँक सिक्युरिटीजच्या मते, दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी या आयपीओमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. आनंद राठीनेही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील दीर्घकालीन संधी आणि योग्य मूल्यांकनाचा विचार करून गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. कांतिलाल छगनलाल सिक्युरिटीज आणि स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट यांसारख्या ब्रोकरेज कंपन्यांनीही या आयपीओबाबत सकारात्मक भूमिका मांडल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. यात नमूद केलेली मते आणि शिफारसी संबंधित तज्ज्ञांच्या असून, ही आमची अधिकृत गुंतवणूक शिफारस नाही. शेअर बाजारातील परिस्थिती वेगाने बदलू शकते. त्यामुळे कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. गुंतवणुकीतून मिळणारा परतावा निश्चित नसतो आणि त्यात नुकसान होण्याचीही शक्यता असते.
