Karnataka DGP Praveen Sood New CBI Director : 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (2023 Karnataka assembly elections) काँग्रेस (Congress) पक्षाला मोठे यश मिळाले आहे. या निकालानंतर काँग्रेस पक्षाचीच सर्वत्र चर्चा होत आहे. यासोबतच कर्नाटकमध्ये आणखी एक चर्चेचा विषय बनला आहे. तो म्हणजे, प्रवीण सूद (Praveen Sood) यांची नियुक्ती.
कर्नाटकचे विद्यमान DGP असलेल्या प्रवीण सूद यांची केंद्रीय तपास यंत्रणा CBI चे पुढील संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर केंद्र सरकारने काल रविवारी (14 मे) त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.
CBI च्या नवीन संचालकांच्या नियुक्तीसाठी शनिवारी एक उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी पीएम मोदी, सरन्यायाधीश चंद्रचूड आणि अधीर रंजन चौधरी उपस्थित होते. या बैठकीत 3 आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांची निवड करण्यात आली. त्यानंतर ही तीन नावे मंत्रिमंडळाच्या निवड समितीकडे पाठवली होती. त्यापैकी सूद यांच्या नावाची निवड करण्यात आली. चौधरी यांनी काल ही माहिती दिली होती.
डी.के. शिवकुमार यांनी सूद यांच्यावर टीका केली होती
कॉंग्रेसचे संकटमोचक असलेल्या शिवकुमार यांनी प्रवीण सूद यांच्यावर जोरदार टीका केली. डी. के. शिवकुमार तर त्यांना ‘नालायक’ देखील म्हणाले होते. आमचे डीजीपी त्यांच्या पदासाठी योग्य नाहीत. ते तीन वर्षे डीजीपी आहेत, पण भाजप कार्यकर्ता म्हणून काम करतात, अशी टीका त्यांनी केली होती.
शिवकुमार यांनी आरोप केला होता की सूद यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर तब्बल २५ केसेस दाखल केल्यात. पण भाजप नेत्यांवर एकही गुन्हा दाखल केला नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. सूद यांच्या अटकेची मागणीही त्यांनी केली होती. दरम्यान, राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास सूद यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही शिवकुमार म्हणाले होते.
शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीला गालबोट; मिरवणूकीत दगडफेकीची घटना
कोण आहेत प्रवीण सूद?
प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून अभियांत्रिकी पदवीधर असलेले सूद हे कर्नाटक केडरचे 1986 च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. ते मुळचे हिमाचल प्रदेशचे आहेत. त्यांची 2004 साली म्हैसूरचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2007 पर्यंत ते या पदावर होते. नंतर त्यांनी बंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. बेंगळुरू शहरातील कायदा व सुव्यवस्था, पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी बेल्लारी आणि रायचूरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.
1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी प्रवीण सूद हे दोन वर्षे या पदावर राहणार आहेत. ते मे 2024 मध्ये निवृत्त होणार होते, मात्र या नियुक्तीनंतर त्यांचा कार्यकाळ मे 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे. 25 मेला सूद हे CBI चे सध्याचे डायरेक्टर सुबोध जयस्वाल यांची जागा घेतील.
शिवकुमार यांच्यावर अनेक आरोप आहेत. सीबीआय, ईडी त्यांची चौकशी करत आहेत. ईडी त्याची दोन प्रकरणांमध्ये चौकशी करत आहे. यातील एक प्रकरण नॅशनल हेराल्डशी संबंधित आहे. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू आहे. आणि अशातच प्रवीण सूद यांची CBI चे पुढील संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. सूद हे डी.के. शिवकुमार यांना अनेकदा नडलेले अधिकारी आहेत. त्यामुळे शिवकुमार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं बोलल्या जातं आहे.