Download App

‘आधी श्रीरामाला कुलुपात बंद केलं, आता बजरंगबलीलाही’.. काँग्रेसच्या ‘त्या’ निर्णयावर मोदींचा हल्लाबोल

Karnataka Elections : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार (Karnataka Elections) रणधुमाळी सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडूनही तुफान प्रचार सुरू आहे. या प्रचारात काँग्रेसने घोषणापत्र जारी केले आहे. या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी केली आहे. कर्नाटकात सरकार आले तर त्यावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे.

काँग्रेसच्या याच जाहीरनाम्यावर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. कर्नाटकातील होसपेत शहरात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंगबलीलाही कुलुपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी श्रीरामाला कुलुपात बंद केले आता जय बजरंगबली बोलणाऱ्यांनाबी कुलुपात बंद करण्याचा संकल्प करत आहे.

मोदी पुढे म्हणाले, आज हनुमानजींच्या या पवित्र भूमीला नमन करणे हे माझ्यासाठी मोठे सौभाग्य आहे. आणि दुर्दैव पहा, मी आज येथे हनुमानजींचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे त्याचवेळी काँग्रेस पार्टीने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात बजरंगबलीला कुलुपबंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आधी श्रीरामाला कुलुपात बंद केले आणि आता जय बजरंगबली म्हणणाऱ्यांना कुलुपात बंद करण्याचा संकल्प केला आहे. देशाचे हे दुर्दैव आहे की काँग्रेस पार्टीला प्रभू श्रीरामापासून तकलीफ होत होती आता त्यांना जय बजरंगबली म्हणणाऱ्यांचाही त्रास होत आहे.

Karnataka : मल्लिकार्जुन खरगेंनंतर त्यांच्या मुलाची PM मोदींवर आक्षेपार्ह टीका

भारतीय जनता पार्टी कर्नाटकचा मान, सन्मान, मर्यादा आणि संस्कृतीवर कोणतेही संकट येऊ देणार नाही. तसेच राज्याच्या विकासासाठी येथील नागरिकांना आधुनिक सुविधा आणि नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभेसाठी येत्या 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही जोरदार टक्कर देण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे.

 

Tags

follow us