खाजवा डोकं! महिन्याकाठी मिळणाऱ्या पगाराला Salary नाव कसं पडलं?

History Of Salary Word घरखर्च, EMI, बचत आणि भविष्यातील नियोजन या सगळ्याच गोष्टी पगारावर अवलंबून असतात. पण...

History Of Salary Word

History Of Salary Word

History Of Salary Word Origin : महिन्याच्या शेवटी मोबाईलवर “Salary Credited” असा मेसेज आला की, अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. घरखर्च, EMI, बचत, गुंतवणूक… सगळ्याच गोष्टी या पगाराभोवती फिरतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ‘Salary’ या शब्दाला ‘Salary’ हे नाव कसं पडलं? या एका शब्दामागे प्राचीन रोम, मौल्यवान मीठ आणि हजारो वर्षांचा रंजक इतिहास दडलेला आहे. त्याचबद्दल जाणून घेऊया…

एकेकाळी मीठच होतं संपत्तीचं प्रतीक

आज मीठ काही रुपयांत सहज मिळतं. मात्र, हजारो वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. अन्नाची चव वाढवण्याबरोबरच अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी मीठ अत्यावश्यक होतं. ते सर्वत्र उपलब्ध नसल्यामुळे दूरवरून आणावं लागायचं. त्यामुळे त्याची किंमतही प्रचंड होती. इतकी की, काही भागांमध्ये मीठाचा वापर वस्तूंच्या मोबदल्यासाठी आणि व्यवहारासाठी केला जात असे. याच इतिहासातून पुढे ‘Salary’ या शब्दाचा जन्म झाल्याचं मानलं जातं.

‘Salary’ शब्दाचा जन्म कसा झाला?

प्राचीन रोमन साम्राज्यात सैनिकांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याला सॅलारियम (Salarium)असं म्हटलं जात असे. याच सॅलारियम या लॅटिन शब्दापासून पुढे इंग्रजीतील ‘Salary’ हा शब्द तयार झाला. इतिहासातील काही उल्लेखांनुसार, त्या काळात सैनिकांना मीठ किंवा मीठ खरेदीसाठी भत्ता दिला जात असे. त्यामुळे सॅलारियम आणि मीठ यांचा संबंध जोडला जातो आणि त्यातूनच पुढे सॅलरी हा शब्द रूढ झाल्याचं मानलं जातं.

इतिहासकार काय सांगतात?

रोमन इतिहासकार प्लिनी द एल्डर यांनी त्यांच्या नॅचरल हिस्ट्री (Natural History) या ग्रंथात मीठाच्या महत्त्वाचा उल्लेख केला आहे. तसेच, सॅलारियम हा शब्द मीठाशी संबंधित असल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आढळतात. मात्र, आधुनिक इतिहासकारांच्या मते रोमन सैनिकांना नेहमीच थेट मीठ वेतन म्हणून दिलं जात होतं, असा ठोस पुरावा उपलब्ध नाही. अनेक संशोधकांच्या मते सॅलारियम हा मीठ खरेदीसाठीचा भत्ता किंवा मीठाशी संबंधित खर्चासाठी दिला जाणारा मोबदला असण्याची अधिक शक्यता आहे. मात्र, सॅलरी या शब्दाचा उगम सॅलारियम मधून झाला, याबाबत सर्वसाधारणपणे सहमती आहे.

वेतनाची पद्धत बदलली… पण शब्द कायम राहिला

काळानुसार वस्तुविनिमयाची जागा नाण्यांनी घेतली. पुढे चलन आणि आता डिजिटल व्यवहारांचं युग आलं. पगार थेट बँक खात्यात जमा होतो. पण ‘Salary’ हा शब्द मात्र हजारो वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक परंपरेची आठवण आजही जपून आहे. आज काळ बदलला, चलनाचे महत्त्व वाढले आणि मिठाची जागा हळूहळू नाणी व कागदी चलनांनी घेतली; पण वेतनाचा इतिहास सांगणारा ‘सैलरी’ हा शब्द मात्र आजही त्या प्राचीन आणि रंजक ऐतिहासिक परंपराची साक्ष देत आहे. त्यामुळे पुढच्या वेळी मोबाईलवर “Salary Credited” असा मेसेज दिसला, तर फक्त खात्यात आलेल्या पैशांचाच विचार करू नका. त्या एका शब्दामागे प्राचीन रोम, मौल्यवान मीठ आणि हजारो वर्षांचा इतिहास दडलेला आहे हेदेखील लक्षात ठेवा.

Exit mobile version